लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रेमी युगुलाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 21:40 IST2022-05-16T21:30:55+5:302022-05-16T21:40:44+5:30
गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले दोघांचे मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रेमी युगुलाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
गुरुग्राम: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या एका जोडप्यानं आत्महत्या केली आहे. प्रेमी युगुलाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. जोडपं गुरुग्रामच्या सुशांत लोक परिसरात भाड्यानं राहत होतं. शेजाऱ्यांनी सोमवारी सकाळी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव नेन्सी (२८) आणि तिच्या प्रियकराचं नाव अश्विनी (२९) आहे. दोघेही मूळचे दिल्लीचे होते. पोलिसांना खोलीत कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. प्रेमी युगुल गेल्या दीड वर्षांपासून सुशांत लोक परिसरात वास्तव्यात होतं, अशी माहिती सुशांत लोक पोलीस ठाणाच्या प्रभारी पूनम हुड्डांनी दिली. तरुणी एका फूड डिलिव्हरी कंपनीत काम करायची, तर तरुण दिल्लीतील एका हॉटेलमध्ये शेफ होता. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दोघांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आल्याचं हुड्डा यांनी सांगितलं.
नेन्सी आणि अश्विनी दिल्लीतील एकाच गावचे रहिवासी होते. ते एकाच जातीमधील होते. आपल्या कुटुंबापासून लपून ते गुरुग्राममध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या कुटुंबीयांना ठावठिकाणा समजल्यानं टोकाचं पाऊल उचलण्यात आलं असावं, असा संशय एका अधिकाऱ्यानं व्यक्त केला. आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यासाठी दोघांच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.