Gunratna Sadavarte: सिल्व्हर ओकवरील हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंसह एसटी कर्मचाऱ्यांना जामीन; अकोट न्यायालयाचाही दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 18:44 IST2022-04-22T18:44:19+5:302022-04-22T18:44:39+5:30
एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Gunratna Sadavarte: सिल्व्हर ओकवरील हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंसह एसटी कर्मचाऱ्यांना जामीन; अकोट न्यायालयाचाही दिलासा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांना चिथावणाऱे वकील गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. असे असले तरी सदावर्तेंच्या मागचे अटकसत्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.
पवारांच्या बंगल्यावर चाल करून जाणाऱ्या ११५ एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या कर्मचाऱ्यांनाही जामीन मिळाला आहे. त्याचबरोबर अकोट न्यायालयाने देखील सदावर्तेंना व जयश्री पाटील यांना अटकपूर्व जामीन दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आता दोघांना ही दिलासा देत अकोट न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदावर्ते यांनी आपण एसटी कर्मचाऱ्यांक़डून पैसे घेतल्याचे न्यायालयात कबूल केले होते. सदावर्ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीत आहेत. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
आर्थिक व्यवहार तपासायचे असल्यास पोलीस कोठडीची काय गरज? पोलीस पहिल्या दिवशी माझ्या घरी आले तेव्हा त्यांनी सगळी तपासणी केली आहे. माझ्या घरी फक्त १३ वर्षांची मुलगी आहे आणि ती देखील पोलिसांना सहकार्य करत आहे, असेही यावेळी सदावर्ते म्हणाले होते. सदावर्ते यांच्या घरातून संशयास्पद कागदपत्रे आणि इतर गोष्टी सापडल्या आहेत. सदावर्ते यांनी परळ आणि भायखळ्याची मालमत्ता व एक गाडी खरेदी केली आहे.