गाझामध्ये मदतीसाठी पैसे गोळा करणाऱ्या सीरियन नागरिकाला अटक; शरीरावर गोळ्यांचे निशाण अन् अरबीतून संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 16:29 IST2025-08-24T16:27:59+5:302025-08-24T16:29:08+5:30
गुजरातमध्ये गुन्हे शाखेने गाझामधील मदतीच्या नावाखाली पैसे गोळा करणाऱ्या एकाला अटक केली आहे.

गाझामध्ये मदतीसाठी पैसे गोळा करणाऱ्या सीरियन नागरिकाला अटक; शरीरावर गोळ्यांचे निशाण अन् अरबीतून संवाद
Gujarat Crime: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदाबाद दौऱ्यापूर्वी पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी गुजरातच्या एलिसब्रिज रीगल हॉटेलमधून एका सीरियन नागरिकाला अटक केली. युद्धग्रस्त गाझामधील गरजू लोकांना मदत करण्याच्या नावाखाली मशिदींमधून देणग्या गोळा करणाऱ्या टोळीत सहभागी असलेल्या या सीरियन नागरिकाच्या अटकेनंतर खळबळ उडाली आहे. त्याचे तीन साथीदार फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गाझा पीडितांच्या नावाने गोळा केलेल्या देणग्यांचा वापर स्वतःच्या सुखसोयींसाठी करत होते असं समोर आलं आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या २३ वर्षीय अली मेगाहत अल-अझरकडे ३६०० अमेरिकन डॉलर्स आणि २५ हजार भारतीय रुपये रोख सापडले आहेत. त्याच्या शरीरावर गोळ्यांसह अनेक जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये उपासमार आणि गाझामधील लोकांवर होणाऱ्या अत्याचारांचे व्हिडिओ देखील सापडले आहेत. अली त्याच्या ३ साथीदारांसह गाझा पीडितांच्या नावाने मशिदी आणि इतर ठिकाणांहून निधी गोळा करत होता. मात्र त्या पैशातून ते चांगली जीवनशैली जगत होते. हे सर्वजण काही विशिष्ट कारणांसाठी अहमदाबादमध्ये रेकी करण्यासाठी आले होते असाही पोलिसांना संशय आहे.
अहमदाबाद पोलिसांची गुन्हे शाखा गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या सहकार्याने सीरियन नागरिक गुजरातमध्ये येण्याचा खरा उद्देश काय आहे आणि त्यांनी मशिदींमधून गोळा केलेले पैसे कुठे पाठवले याचा तपास करत आहे. गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार, अलीसह एकूण ४ सीरियन तरुण सीरियाची राजधानी दमास्कस येथून अबू धाबीला आले होते. २२ जुलै रोजी पर्यटक व्हिसावर कोलकाता येथे पोहोचले आणि २ ऑगस्ट रोजी अहमदाबादला आले. हे सर्व लोक फक्त अरबी भाषेत बोलत होते.
हे सीरियन तरुण अहमदाबादमधील मशिदींमधून गाझा युद्धामुळे झालेल्या उपासमारीचे आणि दुर्घटनेचे व्हिडिओ दाखवून पैसे गोळा करत होते. गुन्हे शाखेने शहरातील सर्व मशिदींमध्ये चौकशी केली. या दरम्यान, आरोपी ऑनलाइन आणि रोख रकमेद्वारे निधी गोळा करत असल्याचे आढळून आले. अहमदाबादमध्ये मिळालेले ते गाझाला पाठवत असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही.मात्र चौकशीदरम्यान अटक केलेल्या सीरियन नागरिकाने कबूल केले की ते ऐशोआरामात जगण्यासाठी देणग्यांच्या नावाखाली पैसे गोळा करत होते.
अलीसोबत अहमद अलहबाश, झकारिया अलजहर आणि युसूफ अलजहर असे आणखी तीन आरोपी होते. हे सर्व एकाच हॉटेलमध्ये राहत होते, पण अलीच्या अटकेपासून तिघेही फरार आहेत. ते भारतातून पळून जाऊ नये म्हणून त्यांच्याविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने सांगितले की, ते काही संशयास्पद लोकांच्या संपर्कात होते. अटक केलेल्या सीरियन नागरिकाने आणि त्याच्या साथीदारांनी पर्यटक व्हिसाच्या अटींचेही उल्लंघन केले.