Gujarat Crime: गुजरातच्या भावनगर येथील ओझ इन्स्टिट्यूटमध्ये एका विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी(11 फेब्रुवारी) घडली आहे. संस्थेच्या कांसिलिंग हॉलमध्ये शिक्षकासमोर ही घटना घडली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थ्याचे नाव कार्तिक असून, तो येथील ओझ इन्स्टिट्यूटमध्ये ट्युशन घेतो. तो याच इंस्टिट्युटमधील एका मुलीशी फोनवर बोलायचा. ही बाब त्या मुलीच्या वडिलांना समजली, ज्यामुळे मुलीचे वडील जगदीश राचड संतापले. त्यांनी यासंदर्भात इन्स्टिट्यूटमध्येच मुलाशी बोलून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण, कार्तिकला बोलत असताना, त्यांनी अचानक त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला.
सुदैवाने तिथे उपस्थित शिक्षकाने आरोपीला वडिलांना रोखले, ज्यामळे कार्तिकचा जीव वाचला. पण, या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये कार्तिक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या हल्ल्यानंतर संस्थेत मोठा गोंधळ उडाला, जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी वडिलांना अटक केली आहे.