GST Department Raid: मुंबईच्या झवेरी बाजारात जीएसटीचा छापा, घबाड सापडले, नोटा आणि चांदीच्या विटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 00:10 IST2022-04-23T00:10:36+5:302022-04-23T00:10:49+5:30
सोनेव्यापाऱ्याची उलाढाल तीन वर्षात 23 कोटींवरुन 1764 कोटी रुपयांवर; संशयास्पद व्यवहार जीएसटीच्या रडारवर

GST Department Raid: मुंबईच्या झवेरी बाजारात जीएसटीचा छापा, घबाड सापडले, नोटा आणि चांदीच्या विटा
मुंबई, दि. 22 :- मुंबईच्या झव्हेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पद वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आल्यानंतर जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही.
कंपनीच्या 35 चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड आणि 13 लाख रुपये किंमतीच्या 19 लाख किलो चांदीच्या विटा आढळून आल्या. राज्य जीएसटी विभागाने सदर जागा सिलबंद केली असून प्राप्तीकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
प्राप्तिकर विभागाने सदर रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी चोरी शोधणे आणि कारवाईची मोहिम तीव्र केली असून हजारो कोटींची जीएसटी चोरी शोधण्यात यश मिळविले आहे. राज्य करविभागाचे सहआयुक्त राहूल द्विवेदी, उपायुक्त विनोद देसाई यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जीएसटी चोरीविरुद्धची कारवाई या पुढच्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे राज्य कर विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.