गोलमाल है भाई सब गोलमाल है! कागदावरच बनवलं बोगस गाव; ५५ योजना आणून ४५ लाख लाटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:51 IST2025-01-23T17:51:21+5:302025-01-23T17:51:50+5:30
खऱ्या ग्रामपंचायतीला बोगस ग्रामपंचायतीपेक्षा कमी निधी दिला जायचा. कारण बोगस ग्रामपंचायतीला मिळणारे पैसे अधिकाऱ्यांच्या खिशात जायचे.

गोलमाल है भाई सब गोलमाल है! कागदावरच बनवलं बोगस गाव; ५५ योजना आणून ४५ लाख लाटले
पंजाबच्या फिरोजपूर इथं सरकारी तिजोरीतील पैसे लाटण्याचा अजब गजब प्रकार समोर आला आहे. २०१९ साली राज्यात काँग्रेस सरकार होते, तेव्हा एका सामाजिक कार्यकर्त्याला याची भनक लागली. याठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांनी कागदावरच एक बोगस गाव बनवून योजनेतील लाखो रुपये हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. फिरोजपूरच्या या कागदावरील गावात विकासाच्या नावाखाली ४५ लाख रुपयांचा घोटाळा करण्यात आला ज्याचा खुलासा ५ वर्षांनी आरटीआयमधून उघड झाला आहे. या प्रकारामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
कसा झाला घोटाळा?
२०१९ पासून सरकारी अधिकाऱ्यांनी फिरोजपूरच्या परिसरात कागदावरच एक नवीन गाव वसवून त्याची बोगस ग्रामपंचायत स्थापन केली. बोगस ग्रामपंचायतीला खऱ्या ग्रामपंचायतीपेक्षा अधिकचा निधी वितरीत करण्यात आला. या बोगस गावाने केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या योजनांमधून ४५ लाख रुपये लाटले. हे सर्व पैसे भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी हडप केल्याचा आरोप होत आहे.
अधिकाऱ्यांनी पैसे लाटण्यासाठी नवी गुट्टी नावाने बोगस ग्रामपंचायत बनवली होती. त्यात ५५ योजनाही सुरू करण्यात आल्या. त्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा समावेश होता. या योजनेतून ४५ लाख रुपये हडप करण्यात आले. तर दुसरीकडे नवी गट्टी नावाची खरोखरची ग्रामपंचायत होती तिथे केवळ ३५ योजना सुरू केल्या होत्या. खऱ्या ग्रामपंचायतीला बोगस ग्रामपंचायतीपेक्षा कमी निधी दिला जायचा. कारण बोगस ग्रामपंचायतीला मिळणारे पैसे अधिकाऱ्यांच्या खिशात जायचे.
दरम्यान, हे प्रकरण उघड होताच अकाली दलाने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. जर सरकारकडे ठोस पुरावे असतील तर दोषींवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी अकाली दलाचे प्रवक्ते दलजीत चीमा यांनी केली आहे. या प्रकरणी तपास सुरू असून जे कुणी अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करू असं ADC अधिकारी लखविंदर सिंह रंधावा यांनी म्हटलं.