पोलिसांचा कारनामा! ड्युटी संपल्यावर उरलेल्या वेळात लूट; ३५ लाखांचे दागिने घेऊन फरार

By कुणाल गवाणकर | Published: January 22, 2021 02:03 PM2021-01-22T14:03:43+5:302021-01-22T14:04:07+5:30

पोलीस उपनिरीक्षकच निघाला टोळीचा म्होरक्या; एकूण सहा जणांच्या मुसक्या आवळल्या

gorakhpur police arrested 6 including 3 policemen in robbery with jewelers | पोलिसांचा कारनामा! ड्युटी संपल्यावर उरलेल्या वेळात लूट; ३५ लाखांचे दागिने घेऊन फरार

पोलिसांचा कारनामा! ड्युटी संपल्यावर उरलेल्या वेळात लूट; ३५ लाखांचे दागिने घेऊन फरार

Next

गोरखपूर: सराफा व्यापाऱ्यांकडून ३५ लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने घेऊन फरार झालेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. गोरखपूर पोलीस आणि गुन्हे शाखेनं संयुक्तपणे ही कारवाई केली. या प्रकरणात तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केली आहे.

गोरखपूरमध्ये पोलिसांनीच लूटमार केल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची सविस्तर माहिती डीआयजी जोगिंदर कुमार यांनी दिली. 'बस्ती जिल्ह्यातल्या पुरानी बस्ती पोलीस ठाण्यात तैनात असलेले आणि गोरखपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिकरीगंजमध्ये राहणारे उपनिरीक्षक धर्मेंद्र यादव यांना लूट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तेच या टोळीचे प्रमुख आहेत. याशिवाय मऊ जिल्ह्यातल्या डीह गावात राहणारे शिपाई महेंद्र यादव आणि गाजीपूर जिल्ह्यातल्या जंगीपूरमध्ये वास्तव्यास असलेले शिपाई संतोष यादव यांना अटक करण्यात आली आहे,' असं कुमार यांनी सांगितलं. 

एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन शिपायांसह त्यांच्यासोबत असणारा बुलेरो गाडीचा चालक देवेंद्र यादव, व्यापाऱ्यांची माहिती देणारा शैलेश यादव आणि त्याचा साथीदार दुर्गेश अग्रहरी यांच्यादेखील मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. 'महाराजगंजमधील निचलौल भागात वास्तव्यास असलेले व्यापारी दीपक वर्मा आणि रामू वर्मा २० जानेवारीला रोडवेजच्या बसनं लखनऊला जात होते. त्यावेळी पोलिसांच्या गणवेशात असलेल्या धर्मेंद्र यादव, महेंद्र यादव आणि संतोष यादव यांनी केंट परिसरातील रेल्वे स्थानक आणि नौसड दरम्यान व्यापाऱ्यांना बसमधून खाली उतरवलं,' असा घटनाक्रम कुमार यांनी सांगितला.

तुम्ही बाळगत असलेली सोनं आणि चांदी अवैध आहे. या प्रकरणात तपास करावा लागेल, असं म्हणत तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांना रिक्षात बसवलं आणि त्यांच्याकडे असलेली ३५ लाखांचं सोनं आणि चांदी घेऊन फरार झाले. व्यापाऱ्यांना वर्दीतील पोलिसांचा संशय आला. त्यांनी याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या माध्यमातून शोध सुरू केला आणि २४ तासांच्या आत लूटमार प्रकरणाचा छडा लावला.
 

Web Title: gorakhpur police arrested 6 including 3 policemen in robbery with jewelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस