ऑनलाइन तिकिटासाठी गुगलची गुगली; तरुणाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:44 IST2020-02-10T05:44:27+5:302020-02-10T05:44:30+5:30
रेल्वे तिकिटाचे १४०० रुपये रिफंड मिळविण्यासाठी गुगलवरून हेल्पलाइन क्रमांक शोधणे एका तरुणाला महागात पडले आहे.

ऑनलाइन तिकिटासाठी गुगलची गुगली; तरुणाची फसवणूक
मुंबई : रेल्वे तिकिटाचे १४०० रुपये रिफंड मिळविण्यासाठी गुगलवरून हेल्पलाइन क्रमांक शोधणे एका तरुणाला महागात पडले आहे. यात तरुणाची ८० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावदेवी येथील रहिवासी असलेला गुरलाल सिंग (२५) याची यात फसवणूक झाली आहे. १५ आॅक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास मोबाइलवरून कणकपूर एक्स्प्रेसचे (वांद्रे ते बिकानेर) तिकीट बुक केले. मात्र तिकीट बुक न होता खात्यातून १ हजार ४४५ रुपये कापले गेल्याने, १६ आॅक्टोबर रोजी त्यांनी गुगलवरून रेल्वेचा हेल्पलाइन क्रमांक मिळवून संपर्क साधला. संबंधित कॉलधारकाने त्यांच्याकड़ून ट्रेन क्रमांक, ट्रेन तिकिटाचे पैसे, मोबाइल क्रमांक व फेल झालेला ट्रान्झॅक्शन आयडी इत्यादीबाबतची माहिती घेत त्यांचा फोन होल्डवर ठेवला.
त्याच वेळी मोबाइलवर एक संदेश आला. त्या वेळी त्याने तिकीट बुकिंग होत असल्याचे सांगून फोन कट केला. पुढे त्यांच्या खात्यातून तब्बल ८ वेळा झालेल्या व्यवहारात ७९ हजार ९९२ रुपये काढण्यात आले होते. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिंग यांनी पोलिसांकडे लेखी अर्जाद्वारे तक्रार केली. त्यानुसार रविवारी या प्रकरणात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.