वाईटातून चांगलं... 'तो' आत्महत्या करायला गेला अन् दोन वर्षांनी पालकांना 'हरवलेला' मुलगा सापडला!
By पूनम अपराज | Updated: July 23, 2019 15:22 IST2019-07-23T15:03:44+5:302019-07-23T15:22:02+5:30
पोलिसांच्या तपासातून बडोदा येथे राहणाऱ्या आई - वडिलांना आपला मुलगा परत मिळाला आहे.

वाईटातून चांगलं... 'तो' आत्महत्या करायला गेला अन् दोन वर्षांनी पालकांना 'हरवलेला' मुलगा सापडला!
मुंबई - दोन वर्षांपासून बेपत्ता असलेला उजयकुमार परमार (१९)) याने वांद्रे - वरळी सी लिंक येथे आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याचं दैव बलवत्तर होतं म्हणूनच सी लिंक तैनात असलेल्या गार्डने त्याला समुद्रात उडी मारण्यापासून वाचविले आणि त्यानिमित्ताने पोलिसांच्या तपासातून बडोदा येथे राहणाऱ्या आई - वडिलांना आपला मुलगा परत मिळाला आहे. याप्रकरणी वरळी पोलीस पुढील तपास करत असून मुलाला आई - वडिलांच्या ताब्यात सोपविले जाईल असे वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाला वरपे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
वरपे यांनी पुढे सांगितले की, २०१७ साली १७ वर्षाचा असताना उजयकुमारने बडोदा येथून पळ काढून मुंबई गाठली होती. त्यापासून तो बेपत्ता झाल्याने अपहरणाचा गुन्हा बडोद्यातील देसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबईत येऊन अजयकुमार छोटी - मोठी कामं करून पोट भरत होता. दादर येथील एका कपड्याच्या दुकानात तो काम करत होता असून नैराश्याने त्याने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करण्याचं ठरविलं. त्याप्रमाणे आज त्याने वरळी येथून वांद्रे येथे जाण्यासाठी उजयकुमारने टॅक्सी केली. वांद्रे - वरळी सी लिंकवर टॅक्सी प्रवासादरम्यान मध्येच थांबवून सी लिंकवरून समुद्रात उडी मारत असताना गार्डने त्याला अडविले. त्यानंतर त्याने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने गळ्यावर आणि दोन्ही हातांवर रागाच्या भरात वार करून घेतले. याबाबत वरळी पोलिसांना माहिती मिळताच जखमी उजयकुमारला भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच या मुलाची माहिती काढत असताना या मुलांबाबत बडोद्यातील देसर पोलीस ठाण्यात २०१७ साली मिसिंग तक्रार असल्याची माहिती समोर आली. मुलाच्या पालकांना आम्ही संपर्क साधला असून ते त्यांना घेऊन जातील अशी माहिती वरपे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मुंबई - वांद्रे - वरळी सी लिंक येथे एका व्यक्तीने केला आत्महत्येचा प्रयत्न https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 23, 2019