संधी दिली, हद्दपार केले.. तरी सुधारला नाही; अखेर स्थानबद्ध कारवाई, येरवड्यात रवानगी
By विलास जळकोटकर | Updated: August 26, 2023 14:35 IST2023-08-26T14:35:11+5:302023-08-26T14:35:21+5:30
पोलीस आयुक्तांकडून ॲक्शन : बाईकचोर, खंडणी उकळणाऱ्या रवी आखाडेवर एमपीडीए

संधी दिली, हद्दपार केले.. तरी सुधारला नाही; अखेर स्थानबद्ध कारवाई, येरवड्यात रवानगी
सोलापूर : शहरात दिसेल त्या भागातून बाईक चोरायची. त्याची परस्पर विल्हेवाट लावायची. लोकांमध्ये दहशत पसरवून खंडणी उकळायची. अशा १४ गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगार रवी आखाडे याला सुधारण्यासाठी पोलिसांनी संधी दिली. हद्दपारीची कारवाई केली. तरीही सुधारणा झाली नाही. अखेर त्याला पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध कारवाई केली. शुक्रवारी रात्री उशिरा पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी केली.
सराईत गुन्हेगार रवी नामदेव आखाडे याने शहरातल्या सातही पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकली चोरल्या. त्याची परस्पर विल्हेवाट लावली. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध १४ गंभीर गुन्हे नोंदलेले आहेत. मोटारसायकली चोरीचे गुन्हे करणारा रवी घातक शस्त्रांद्वारे लोकांमध्ये दहशत पसरवून जबरी साथीदारांच्या मदतीने चोऱ्या करायचा. सर्वसामान्य नागरिकांना दुखापत करून धमकी द्यायचा. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रारी वाढल्या होत्या.
लोकांना वेठीस धरुन खंडण्याही उकळाचा. सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण झाली होती.
तरीही गुन्हेगारी कृत्य सुरु
रवीला वाढत्या गुन्हेगारी कृत्यापासून रोखण्यासाठी २०२१ मध्ये हद्दपार केले. त्यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट सार्वजनिक शांतता धोक्यात आणण्याचे गुन्हेगारी कृत्य त्याने सुरूच ठेवले होते. यामुळे पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी त्याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.