घणसोलीत चिमुरड्याची अज्ञातांकडून हत्या; घरालगतच गोणीत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 23:49 IST2020-09-18T23:49:01+5:302020-09-18T23:49:29+5:30
ओमकार साठे (४) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तो घणसोली गाव येथील बाळाराम वाडीमध्ये राहायला होता. त्याचे वडील रंगकाम कामगार असून, त्यांना ओमकारपेक्षा मोठ्या दोन मुली आहेत.

घणसोलीत चिमुरड्याची अज्ञातांकडून हत्या; घरालगतच गोणीत आढळला मृतदेह
नवी मुंबई : चार वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना घणसोली येथे शुक्रवारी घडली आहे. हा मुलगा खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याने त्याचा शोध सुरू होता. यावेळी घरालगतच गोणीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमागे त्याच ठिकाणी दिवस-रात्र वावर असलेल्या गर्दुल्ल्यांवर संशय व्यक्त केला जात आहे.
ओमकार साठे (४) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तो घणसोली गाव येथील बाळाराम वाडीमध्ये राहायला होता. त्याचे वडील रंगकाम कामगार असून, त्यांना ओमकारपेक्षा मोठ्या दोन मुली आहेत. शुक्रवारी शंकर हे कामावर गेले असता, त्यांची पत्नी व मुले घरी होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ओमकार हा घराबाहेर खेळत होता. या दरम्यान तो एकदा घरी येऊन गेला, परंतु त्यानंतर तो पुन्हा घरी न आल्याने आईने शोधाशोध केली असता, पायऱ्यांवर त्याच्या चिखलाने भरलेल्या पायाचे ठसे दिसून आले. यावरून त्याला पायऱ्यांवरून उचलून नेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ओमकार अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनी शोधाशोध केली. अखेर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरापासून काही अंतरावरच एक गोणी पडलेली असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. ती उघडली असता, त्यामध्ये ओमकार आढळून आला. नागरिकांनी तत्काळ त्याला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
- शवविच्छेदनासाठी मृतदेह पालिका रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.