ठाणे - कल्याण येथील एका हॉटेलच्या मालकी हक्कावरून झालेल्या वादातून १४ वर्षांपूर्वी झालेल्या राकेश शेट्टी यांच्या खून प्रकरणात कुख्यात गँगस्टर फजल उर रेहमान उर्फ फजलू उर्फ सिंग उर्फ मोना तन्वीर उर्फ डॉक्टर उर्फ चिंगचोंग उर्फअली बशीद अली शेख यास ठाणे खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली. त्याला अहमदाबाद न्यायालयातून ट्रान्झिस्ट कस्टडीद्वारे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला १३ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.राकेश शेट्टी आणि हरिष वझराणी (अटक आरोपी) यांच्यात कल्याण येथील ‘धुरू बार अँड रेस्टॉरंट’ या हॉटेलच्या मालकीवरून वाद सुरू होता. हा बार राकेश शेट्टी ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे वझराणी याने त्याच्या खुनाची कुख्यात गँगस्टर फजलु आणि त्याच्या साथीदाराला २० लाखांमध्ये सुपारी दिली होती. या सुपारीमुळे २००५ मध्ये फजलु गँगच्या टोळीने राकेश याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केला होता. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. या खुनाचा खंडणी विरोधी पथकाकडूनही समांतर तपास करण्यात येत होता. हत्येच्या कटातील वझरानी याच्यासह सुनील शेट्टी यास याआधीच अटक झाली होती. मात्र, यातील मुख्य आरोपी फजल उर रेहमान शेख हा गेल्या १४ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता. त्याचा शोध सुरू असतांनाच अहमदाबाद पोलिसांनी एका गुन्ह्यात त्याला अटक केल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली. त्यानुसार अहमदाबाद न्यायालयातून ट्रान्सफर वारन्ट द्वारे त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खून प्रकरणात गँगस्टर फजल शेखला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 01:14 IST