गणपती विसर्जनाच्या गर्दीचा फायदा चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 21:51 IST2019-09-13T21:50:46+5:302019-09-13T21:51:43+5:30
गर्दीचा फायदा उचलून या चोरटयांनी अनेक भक्तांच्या सोनसाखळ्या आणि पाकिटे लांबवली

गणपती विसर्जनाच्या गर्दीचा फायदा चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
मुंबई - मुंबईत काल गणेश विसर्जनाची धूम सुरु असताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन गणेश भक्तांच्या सोनसाखळ्या आणि पाकिटे लांबविणाऱ्या परराज्यातील गुन्हेगारांच्या टोळीतील आठ जणांना गुन्हे शाखा कक्ष ६ च्या पोलीस पथकाने गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमालाही हस्तगत करण्यात आला आहे. या चोरट्यांनी मुंबईचा प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या लालबागचा राजा या गणेशोत्सवाला अलोट गर्दी जमते याच गर्दीचा फायदा उचलून या चोरटयांनी अनेक भक्तांच्या सोनसाखळ्या आणि पाकिटे लांबवली असल्याचे तपासात उघडकीस आले. तसेच लालबाग परिसरात गणपती विसर्जन मिरवणुकीत ज्या भाविकांचे मोबाईल फोन चोरीस गेले असतील अशा भाविकांनी काळाचौकी पोलीस ठाण्यास संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी केले आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष ६ च्या पथकाला खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या गर्दीत सोनसाखळी आणि पाकिटे चोरणारी परराज्यातील गुन्हेगारांची टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने ठिकठिकाणी गर्दीच्या ठिकाणी सापळे रचण्यास सुरुवात केली. असाच सापळा लोटस जंक्शन शिवाजीनगर या ठिकाणी सापळा रचला. दरम्यान, खबऱ्याने स्कार्पिओ गाडीची दिलेल्या माहितीच्याआधारे पोलिसांनी गाडी थांबविण्यासाठी इशारा केला. मात्र, स्कॉर्पिओ वेग वाढवून पळविण्यात आली. पोलीस पथकाने गाडीचा पाठलाग करून काही अंतरावर स्कॉर्पिओ गाडी थांबवली. पोलिसांनी वाहन आडवे घालून गाडीस घेराव घातला. गाडीतील ८ इसमांना काल ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी करून अंगझडतीत सोनसाखळ्या आणि रोख रक्कम उडविल्याची कबुली आरोपींनी दिली.
चोरट्यांनी दिली कबुली
मुंबईचा प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या लालबागचा राजा या गणेशोत्सवाला अलोट गर्दी जमते याच गर्दीचा फायदा उचलून या चोरटयांनी अनेक भक्तांच्या सोनसाखळ्या आणि पाकिटे लांबविली. त्या भाविकांनी या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे नोंदविले. गुन्हे शाखा कक्ष ६ च्या पथकाने केलेल्या चौकशीतही आरोपींची कबुली दिली. गुन्हे शाखेने काळाचौकी पोलीस ठाण्याच्या ताब्यात या आरोपीना दिले. पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.