ओला चालकाला लुबाडणारे गजाआड, एक आरोपी अल्पवयीन
By प्रशांत माने | Updated: October 15, 2023 21:18 IST2023-10-15T21:18:02+5:302023-10-15T21:18:17+5:30
याप्रकरणी गुप्ताच्या तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा नोंद झाला होता.

ओला चालकाला लुबाडणारे गजाआड, एक आरोपी अल्पवयीन
डोंबिवली: ओला चालकाच्या गळयाला कटर लावून त्याच्याकडील ३९ हजार १९९ रूपयांचा मुद्देमाल लांबविणा-या चौघा आरोपींना रामनगर आणि कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. चौघांपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे.
९ ऑक्टोबरच्या पहाटे साडेचारच्या सुमारास मोबाईल अॅपद्वारे मेसेज पाठवून चौघांपैकी एकाने ओला कार बुक केली होती. कारचालक विशाल गुप्ता बुकींग प्रमाणे चोळेगाव येथील श्री समर्थ बिल्डिंग समोर आला असता चौघेजण त्याच्या कारमध्ये बसले आणि गुप्ताच्या गळयाला कटर लावून त्याच्याकडील ३९ हजाराचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी गुप्ताच्या तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा नोंद झाला होता.
या गुन्ह्याचा तपास रामनगर पोलिसांसह कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस देखील करीत होते. यात घटनास्थळाचे सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चौघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. आकाश सिंग ( वय २०), राहुल जगताप ( वय २०), सन्नी तुसाबंड (वय १८ ) अशी तीन अटक आरोपींची नावे आहेत. चौथा आरोपी अल्पवयीन असल्याची माहीती रामनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांनी दिली. चोरण्यात आलेला सर्व मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आल्याचे गिते यांनी सांगितले.