परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्राने गळा आवळून केली मित्राची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 15:49 IST2021-06-20T15:49:04+5:302021-06-20T15:49:49+5:30
Crime News. बुलढाणा जिल्ह्यातील दोघेही अकोल्यात करत होते नीट परीक्षेची तयारी.

परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्राने गळा आवळून केली मित्राची हत्या
अकोला : स्थानिक सिव्हिल लाईन पोलिस ठाणे हद्दीत येणाऱ्या शास्त्री नगर परिसरात एका अल्पवयीन मित्रानेच आपल्या रूम पार्टनर असलेल्या मित्राची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. प्रतीक लवंगे असे मृतकाचे नाव असून आरोपी व मृतक दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर असे की,स्थानिक सिव्हील लाईन पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर परिसरातील एका खोलीत बुलढाणा जिल्ह्यातील दोन अल्पवयीन युवक नीट परीक्षेच्या तयारीकरिता राहावयास आले होते. सदर दोघेही युवक हे जिवलग मित्र असल्याने एकाच खोलीत भाड्याने राहत होते. 17 जून रोजी कुठल्या तरी कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि सदर वादातच प्रतीक लवंगे या युवकाची त्याच्या मित्राने गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.