माजी केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या नावाने फसवणुकीचे रॅकेट, पीडितांना पैसे कधी मिळणार?

By योगेश पांडे | Updated: December 13, 2024 00:14 IST2024-12-13T00:14:28+5:302024-12-13T00:14:44+5:30

विदर्भातील शेकडो बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा : फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मोकाटच

Fraud racket in the name of former Union Minister Narendra Singh Tomar, when will the victims get the money? | माजी केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या नावाने फसवणुकीचे रॅकेट, पीडितांना पैसे कधी मिळणार?

माजी केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या नावाने फसवणुकीचे रॅकेट, पीडितांना पैसे कधी मिळणार?

नागपूर : बोकारो पोलाद प्रकल्पासह इतर सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून गंडविण्याच्या रॅकेटमध्ये मोठा खुलासा समोर आला आहे. मागील वर्षी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. मात्र गुन्हा दाखल झालेले मूळ सूत्रधाराचे एजंटच होते. प्रत्यक्षात मूळ आरोपी मोकाटच असून माजी केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे नाव वापरून फसवणुकीचे रॅकेट चालविण्यात आले होते. अद्यापपर्यंत या प्रकरणातील पीडितांना फसवणुकीची रक्कम परत मिळालेली नाही व त्यांची अद्यापही पायपीट सुरूच आहे.

गोविंद लक्ष्मण चौधरी (६१, कोष्टीपुरा, सीताबर्डी) यांचा मुलगा अनुप हा नोकरीच्या शोधात होता. आरोपी रामदास रगतपुरे (चंद्रमणीनगर) याने चौधरी यांच्याशी संपर्क साधला व बोकारो पोलाद प्रकल्पात ग्रेड-३ पदावर नोकरी लावून देतो असे आमिष दाखविले होते. त्याने त्याच्यावर तत्कालीन केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचा वरदहस्त असल्याची बतावणी केली होती. आरोपीने त्यांना नरेंद्रसिंह तोमर यांच्या नावाने २.५१ लाखांचा धनादेश बनविण्यासदेखील सांगितले होते. तर ऑक्टोबर २०१८ ते एप्रिल २०२३ या कालावधीत अनुपकडून एकूण १० लाख १ हजार रुपये घेतले. मात्र नोकरी लागली नाही. 

अनुपने वारंवार विचारणा केल्यानंतर अजय शशीकुमार पिल्लई (कटंगीकला, गोंदिया) व विवेक कापगते (बालाजीनगर, गोंदिया) यांनी अनुपला बोकारे प्रकल्पातील नोकरीचे बनावट नियुक्तिपत्र दिले. आश्चर्याची बाब म्हणजे अनुप तेथे गेला, मात्र त्याला घरीच लिपीक येऊन हजेरी घेईल असे सांगण्यात आले. अनुप स्वत:हूनच बोकारो प्रकल्पात गेल्यावर तेथे नियुक्तिपत्र बोगस असल्याची बाब समोर आली. त्याने वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर २०२० साली रगतपुरेने अनुपला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या रायपूर कार्यालयात नियुक्तीचे खोटे पत्र दिले. तेथे गेल्यावर तेदेखील बोगस असल्याची बाब समोर आली. त्यानंतर २०२१ मध्ये रगतपुरेने अनुपचे वडील गोविंद यांना पाच लाखांचे दोन धनादेश दिले. 

मात्र प्रत्यक्षात फसवणुकीची रक्कम परत मिळालीच नाही. अखेर चौधरी यांनी एप्रिल २०२३ मध्ये तक्रार केली होती. सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपींना अटक झाली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. मात्र त्यानंतर अनेकांनी चौधरी यांना संपर्क केला. नरेंद्रसिंह तोमर यांचे नाव घेऊन आरोपींनी विदर्भातील शेकडो बेरोजगारांना गंडा घातल्याची बाब समोर आली. आरोपी आता जामिनावर बाहेर असून अद्यापही चौधरी यांना मेहनतीची कमाई परत मिळण्याची प्रतीक्षा आहे.

सूत्रधार महंतो गेला कुठे ?
रगतपुरे व त्याचे सहकारी हे या रॅकेटमध्ये केवळ एजंटसारखेच काम करत होते. या रॅकेटचा मूळ सूत्रधार महंतो नावाचा व्यक्ती असून त्याने या पैशांतून देशात विविध ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. तो सूत्रधार पोलिसांच्या रडारवर आलेलाच नाही. या प्रकरणाची पाळेमुळे खणण्यात पोलिसांकडूनदेखील चालढकल सुरू असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

कुणी विकले घर तर कुणी शेती
रगतपुरे याच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांपैकी काहींनी नोकरीसाठी पैसे जमविण्यासाठी घर विकले तर चौधरीसारख्या काहींनी कष्टाने उभी केलेली शेती विकली. एक जण तर इतका कर्जबाजारी झाला की त्याला राहते गाव सोडावे लागले. आश्चर्याची बाब म्हणजे तोमर यांचे नाव वापरून आरोपींनी अनेकांना गंडा घातला. शिवाय त्यांच्या नावाने घेतलेला डीडीदेखील त्यांनी नवी दिल्लीतील एका बँकेत वटविला.

Web Title: Fraud racket in the name of former Union Minister Narendra Singh Tomar, when will the victims get the money?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.