तरूणांनो, सतर्क राहा! पैसे मोजून लग्न करायचे अन् लग्न होताच नवरी 'सावधान'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 16:43 IST2022-05-28T16:43:15+5:302022-05-28T16:43:37+5:30
विविध माध्यमांतून फसवणुकीच्या घटना घडताना दिसतात. आता अनेक जिल्ह्यात लुटेरी दुल्हनची दहशत निर्माण झाली आहे.

तरूणांनो, सतर्क राहा! पैसे मोजून लग्न करायचे अन् लग्न होताच नवरी 'सावधान'
गोंदिया : सध्या फसवणुकीचा नवा फंडा सुरु झालेला आहे. परराज्यातून मुली आणायच्या आणि लग्न जमवून द्यायचे. लग्नानंतर पैसे घेऊन नवरीने धूम ठोकायची, असे प्रकार विविध जिल्ह्यात घडल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे गोंदियाकरांनो सावधान, संपूर्ण चौकशी, माहिती गोळा करून पुढील पावले उचलून लग्न करा, अन्यथा फसवणुकीला सामोरे जावे लागेल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
विविध माध्यमांतून फसवणुकीच्या घटना घडताना दिसतात. आता अनेक जिल्ह्यात लुटेरी दुल्हनची दहशत निर्माण झाली आहे. परराज्यातील मुली आणून लग्न लावून द्यायचे, दोन दिवसांनंतर पैसे आणि दागिने घेऊन फरार व्हायचे, असले प्रकार सुरु आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वर मंडळींनी ही बाब गांभीर्याने घेऊन वधू मंडळींकडील सर्व माहिती अचूक घ्यावी. नंतर ते शक्य होत नाही, हे मात्र तितकेच खरे. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहून पुढील पावले उचलावीत, अन्यथा फसवणुकीला सामोरे जावे लागेल. सध्या फसवणुकीचे नवनवे फंडे वापरले जात आहेत. सतर्क राहिल्यास फसवणुकीचे प्रकार टाळता येतील.
लग्नासाठी मुली मिळेनात
मुलींच्या अपेक्षा मोठ्या असल्याने अनेकांना विवाहयोग्य मुली मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकजण वय वाढत असल्याच्या चिंतेत लग्नाची घाई करून अनोळखी मुलीशी लग्न करण्यास तयार होतात. मात्र, अशा मुलांची नंतर फसवणूक होते.
कोठून आणल्या जातात या मुली ?
अशा मुली परराज्यातून आणल्या जातात. अशा मुलींकडून फसवणुकीचे धंदे अनेक ठिकाणी सुरु असतात. नवनवीन फंडे वापरून फसवणूक केली जाते. यात विनाकारण मुलाला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच वर मंडळाची बदनामी होते. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
लग्नासाठी अनोळखीला पैसे देऊ नका
-लग्न जमविण्यासाठी अनोळखी व्यक्तिला पैसे देऊ नका, अनेकदा पैसे घेऊन मध्यस्थी फरार होतात.
-आधी मुली मिळणे कठीण झाल्याने असे भामटे ठिकठिकाणी पाहावयास मिळतात. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
गोंदिया जिल्ह्यात असा प्रकार नाही, पण तरीही...
गोंदिया जिल्ह्यात असा प्रकार अद्याप घडलेला नाही. मात्र, लगतच्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी लुटेरी दुल्हनची दहशत चांगलीच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विवाहयोग्य मुलांनी याबाबत अधिक दक्ष राहून वधू मंडळीकडील सर्व बाबी नीट तपासून घ्याव्यात, तिची माहिती गोळा करून चौकशी करावी, योग्य वाटले तरच विवाह करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.