प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियाने केली फसवणूक; पोलिसांनी केली अटक
By पूनम अपराज | Updated: December 29, 2020 20:24 IST2020-12-29T20:23:56+5:302020-12-29T20:24:33+5:30
Crime News : मुंबई पोलिसांनी त्यांची टू सीटर स्पोर्ट्स गाडीही जप्त केली आहे.

प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियाने केली फसवणूक; पोलिसांनी केली अटक
मुंबईपोलिसांनी मोठं रॅकेट उद्ध्वस्त करत प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरियाला बेड्या ठोकल्या आहेत. प्रसिद्ध कार डिझायनर आणि डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रियाला मुंबईपोलिसांच्या सीआययूने अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करण्याच्या आरोपाखाली दिलीप छाब्रिया याला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांची टू सीटर स्पोर्ट्स गाडीही जप्त केली आहे.
मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटने ही मोठी कारवाई केली. सीआययूचे प्रमुख, सहाय्य्क पोलीस निरीक्षक सचिन वाजे यांच्या पथकाने अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात दिलीप छाब्रियाला अटक केली आहे. पोलिसांनी भा. दं. वि. कलम 420, 465, 467, 468, 471, 120 बी आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयात दिलीप छाब्रियाची एक स्पोर्ट्स कार पार्क करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कार डिझायनर आणि कार मॉडिफिकेशन स्टुडिओ 'डीसी डिझाईन' चे संस्थापक दिलीप छाब्रिया याला अटक केल्याने उच्चभ्रू वर्गात खळबळ उडाली आहे. त्याच्यावर मल्टीपल कार रजिस्ट्रेशनचे रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. त्याच्याकडील सुमारे 75 लाख रुपयांच्या किंमतीची स्पोर्ट्स कार पोलिसांनी जप्त केली.
या हाईएंड स्पोर्ट कारची नोंद इंद्रमल रमानीच्या नावावर आहे, जी तमिळनाडू प्रादेशिक परिवहन कार्यालयात इंद्रमल रमानीच्या नावावर नोंदली गेली आहे. मुंबई पोलिसांच्या सहआयुक्तांनी या प्रकरणाची खातरजमा केली आहे. ते आता या प्रकरणाची अधिक कसून चौकशी करतील.
अटकेनंतर दिलीप छाब्रिया यांना मुंबई पोलिस मुख्यालयात ठेवण्यात आले असून, त्यांनी याप्रकरणी फसवणूक, खोटेपणा, विश्वासघात आणि फौजदारी कट रचल्याबद्दल एफआयआर दाखल केला असून याप्रकरणी लवकरच आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. नोंदणीची कागदपत्रे बनावट होती आणि अशा प्रकारे बऱ्याच वाहनांची नोंदणी करण्यात आली असल्याचे एका रॅकेटचा शोध पोलीस घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तक्रारी करणार्यांमध्ये अभिनेतेही आहेत
दिलीप छाब्रिया हे देशातील एक सुप्रसिद्ध कार डिझायनर आहेत. त्याने अनेक सेलिब्रिटीज, विशेषत: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या व्हॅनिटी व्हॅन डिझाइन केल्या आहेत. खरं तर, पाच तक्रारींपैकी एक अशी अभिनेत्री आहे ज्याने दिलीप छाब्रियावर फसवणूक आणि बनावट कागदपत्रं बनवल्याचा आरोप केले आहेत.छाब्रिया यांची गुन्हे शाखा कसून चौकशी करणार आहे.