विमानतळावर ‘कस्टम’चा लाचखोरीचा धडाका सुरूच; ४ जणांना CBI कडून अटक 

By मनोज गडनीस | Published: February 21, 2023 05:41 AM2023-02-21T05:41:41+5:302023-02-21T05:42:19+5:30

१० दिवसांत चार अधिकारी सीबीआयकडून जेरबंद; जी-पेवर स्वीकारली लाच

Four personnel of the Mumbai airport's Customs department have been booked for accepting bribes | विमानतळावर ‘कस्टम’चा लाचखोरीचा धडाका सुरूच; ४ जणांना CBI कडून अटक 

विमानतळावर ‘कस्टम’चा लाचखोरीचा धडाका सुरूच; ४ जणांना CBI कडून अटक 

googlenewsNext

मुंबई : परदेशातून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रवाशांकडून कस्टम अधिकाऱ्यांनी पैसे उकळण्याच्या घटना वाढीस लागल्या असून १० आणि ११ फेब्रवारीला आणखी दोन प्रवाशांकडून अनुक्रमे ७ हजार व ५ हजार रुपयांची लाच जी-पेवरून स्वीकारल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. गेल्या दहा दिवसांत मुंबई विमानतळावर जी-पेच्या माध्यमातून लाचखोरी झालेली ही चौथी घटना आहे.

विशेष म्हणजे, त्यातील तीनही प्रकरणांतील पैसे हे एका संजय जोशी नावाच्या इसमाच्या मोबाईल नंबरवर ट्रान्सफर झाले आहेत. लाचखोरी केलेल्या या सर्व कस्टम अधिकाऱ्यांना सीबीआयने अटक केली आहे. आतापर्यंत या लाचखोरीच्या प्रकरणात कस्टम विभागाच्या दोन अधीक्षक दर्जाच्या, एक निरीक्षक आणि एक हवालदार यांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लाचखोरी प्रकरणातील ताजी कारवाई १० व ११ फेब्रुवारीला झाली. 

दोन्ही प्रकरणात हवालदाराचा सहभाग 
दोन्ही प्रकरणात हवालदार सचिन वाडकर सहभागी होता. त्याची माहिती मिळाल्यामुळे सीबीआयच्याच एका अधिकाऱ्याने या प्रवाशाला फोन करत तुम्ही विमानतळावरून कस्टम अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून काही रक्कम जी-पे केली आहे का, याची विचारणा केली. या प्रवाशाने होकार दिल्यानंतर ते पैसे कस्टम शुल्क नव्हते तर अधिकाऱ्यांनी ते उकळल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्याने त्यांना सांगितले. त्यानंतर आपली फसवूणक झाल्याचे या प्रवाशाच्या लक्षात आले. त्यानंतर या प्रवाशाने सीबीआयला दिलेल्या लेखी तक्रारीची पडताळणी करत सीबीआयने गुन्हा दाखल केला. या प्रकरणी रिंकू सांगा या कस्टमच्या निरीक्षकाला आणि संतोष वाडकर याला सीबीआयने अटक केली आहे.

२८ हजारांची ड्युटी भरा
१० फेब्रुवारीला केरळचा रहिवासी असलेला एक प्रवासी मुंबईत पहाटे दाखल झाला. तो ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडल्यावर काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेल्या एका कस्टम अधिकाऱ्याने त्याला थांबवत त्याच्याकडील आयफोनवर २८ हजार रुपयांची ड्युटी भरण्यास सांगितले. मात्र, हा आयफोन आठ महिन्यांपूर्वी खरेदी केल्याचे या प्रवाशाने या अधिकाऱ्याला सांगितले. मात्र, तो अधिकारी ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने दुसऱ्या अधिकाऱ्याला बोलावले. या अधिकाऱ्याने या प्रवाशाकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली अन्यथा कारवाई करण्याची धमकी दिली. मात्र, आपल्याकडे पैसे नसल्याचे प्रवाशाने सांगितले तेव्हा एक नंबर देत त्यावर पैसे जी-पे करण्यास सांगितले. ७ हजार रुपये संजय जोशी नावाच्या व्यक्तीच्या नावे ट्रान्स्फर झाले. सीबीआयने अधीक्षक श्याम सुंदर गुप्ता आणि हवालदार संतोष वाडकर याला अटक केली आहे.

११ फेब्रुवारीला घडलेल्या दुसऱ्या घटनेत, पुण्याची रहिवासी असलेली एक महिला प्रवासी दुबईतून मुंबईत दाखल झाली. तिने परदेशात सामान खरेदी केले असल्यामुळे ती रेड चॅनलमधून बाहेर पडली. त्यावेळी कस्टम अधिकाऱ्यांनी तिला घेरले. तिच्याकडे ८ ग्रॅम वजनाचा एक आणि ६ ग्रॅम वजनाचा एक असे दोन दागिने होते तर एक आयफोन होता. तिला या अधिकाऱ्यांनी या सामानावर पाच हजार रुपयांचे शुल्क भरावे लागेल असे सांगत हे पैसे जी-पे द्वारे भरण्यास सांगितले. तिला कोणतीही कल्पना नसल्याने तिने ते पैसे जी-पे केले. हे पैसे देखील संजय जोशी याच्याच खात्यावर गेले. 

Web Title: Four personnel of the Mumbai airport's Customs department have been booked for accepting bribes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.