क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आणखी ४ जणांना अटक, ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 22:12 IST2021-10-05T22:10:48+5:302021-10-05T22:12:16+5:30
Cruise Drugs Case : ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आणखी ४ जणांना अटक, ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी
मुंबईत क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरील क्रूझ जहाजावर अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी त्यांना मुंबईतील न्यायालयात हजर केले. या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल कादिर शेख, श्रेयस नायर, मनीष दर्या आणि अविन साहू अशी या नव्या आरोपींची नावे असून त्यांना मंगळवारी मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.
इतर आठ जणांमध्ये आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धामेचा, विक्रांत चोकर, इस्मीत सिंग, नुपूर सारिका, गोमित चोप्रा आणि मोहक जसवाल यांचा समावेश आहे. या आठ जणांना सोमवारी मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टात हजर करण्यात आले आणि त्यांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. एनसीबीने आर्यन आणि इतर आरोपींची सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने क्रूझचे सीईओ जुर्गन बेलोम (Jurgen Bailom) यांना पुन्हा समन बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझवर आणखीही काही लोक ड्रग्स घेत असल्यासंदर्भात तपास केला जात आहे. दरम्यान, सोमवारी रात्री एनसीबीनं (NCB) मुंबईतील गोरेगाव परिसरात धाड टाकली. यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर आणखी दोघांना अटक करण्यात आली.