कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे जंक्शनवर प्रतीक्षा करत असलेल्या एका महिलेला चार जणांनी मैत्रीचे आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर, शुक्रवारी सकाळी पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
संबंधित महिला एका केटरिंग सर्व्हिसमध्ये काम करते. ती गुरुवारी रात्री कोरमंगला येथील ज्योती निवास कॉलेज जंक्शनवर उभी होती. यावेळी चार तरुण तिच्या जवळ आले आणि तिच्याशी बोलू लागले. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तिच्यासोबत मैत्री केली आणि तिला एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आमंत्रित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवणानंतर चारही आरोपींनी महिलेला जबरदस्तीने हॉटेलच्या छतावर नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यानंतर, घडलेल्या घटनेसंदर्भात कुणाला सांगितले, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही आरोपींनी पीडितेला दिली.
आरोपी शुक्रवारी सकाळी ६ वाजता पीडितेला सोडून निघून गेला. यानंतर ती घरी पोहोचली आणि तिने तिच्या पतीला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी पोलिसांच तक्रार दाखल केली. पोलिस तपासानुसार, संबंधित चारही आरोपी दुसऱ्या राज्यातील आहेत आणि ते बेंगळुरूमधील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये काम करतात. यांपैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
यासंदर्भात माहिती देताना सह पोलीस आयुक्त (पूर्व) रमेश बानोथ म्हणाले, "महिलेच्या तक्रारीच्या आधारे, भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ७० (सामूहिक बलात्कार) अंतर्गत कोरमंगला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चौथ्याची ओळख पटली आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल." पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.