प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखवून चार कोटींना गंडवले; उद्याेजकाची श्रीनगर पाेलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:10 IST2025-11-03T12:05:26+5:302025-11-03T12:10:13+5:30
बांधकाम व्यावसायिक दीपक गाेसर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखवून चार कोटींना गंडवले; उद्याेजकाची श्रीनगर पाेलिसांत तक्रार
लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केल्यास जादा नफा देण्याच्या प्रलोभनाने चार काेटींची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक दीपक गाेसर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील उद्याेजकाने श्रीनगर पाेलिसांत तक्रार दाखल केली.
मुंबईतील रहिवासी सुंदरजी शहा (वय ८५) आणि गाेसर हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. गाेसर यांचा त्रिदेव कन्स्ट्रक्शन या नावाने मुंबई आणि ठाण्यात बांधकाम व्यवसाय आहे. ते झाेपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्पही विकासाकरीता घेत असल्याची माहिती त्यांनीच शहा यांना दिली. जानेवारी २०१६ मध्ये गाेसर हे शहा यांच्या ठाण्यातील कार्यालयात गेले हाेते. त्यांच्या बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केल्यास बांधकामातील नफा देईल, अशी त्यांनी बतावणी केली.
भरघोस नफ्याचे आश्वासन
या प्रकल्पासाठी मिळालेल्या परवानग्या, जमीन मालकांना दिलेले पेमेंट आणि जमीन मालकासाेबतचे करारही गाेसर यांनी शहा यांना दाखविले. हे प्रकल्प १२ महिन्यांत पूर्ण न झाल्यास गुंतवणूक रकमेवर प्रतिवर्ष १८ टक्के व्याज आणि बांधकामातील फायद्याची रक्क्म देण्याचे सांगून त्यांना गुंतवणुकीस प्राेत्साहित केले.
त्यानुसार गाेसर याच्यावर विश्वास ठेवत शहा यांच्यासह त्यांची पत्नी आणि भावजय यांनीही त्यांच्या त्रिदेव कन्स्ट्रक्शनमध्ये गुंतवणूक केली. त्यात स्वत: शहा यांनी एक काेटी ८० लाख, जया यांनी एक काेटी ४० लाख तर प्रतिभा शहर यांनी ८० लाख अशी चार काेटींची त्यांनी गुंतवणूक केली.
प्रत्यक्षात गुंतवणुकीतील रक्कम किंवा त्यावरील व्याज किंवा इतर काेणताही फायदा न देता, त्यांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात येताच शहा यांनी श्रीनगर पाेलिस ठाण्यात दीपक गाेसर यांच्याविरुद्ध ३० ऑक्टाेबरला गुन्हा दाखल करण्यात आला.