पत्नीसोबत जबरदस्तीनं शारिरीक संबंध बनवणे बलात्कार होत नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 14:32 IST2021-08-26T14:32:15+5:302021-08-26T14:32:21+5:30
Chhattisgarh High Court: छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन के चंद्रवंशी यांनी हा निर्णय दिला आहे.

पत्नीसोबत जबरदस्तीनं शारिरीक संबंध बनवणे बलात्कार होत नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा
बिलासपूर: पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत लैंगिक कृत्य करणं म्हणजे बलात्कार होत नाही, असा निर्वाळा छत्तीसगडउच्च न्यायालयानं दिला आहे. फक्त, पत्नीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं, असं न्यायालयानं म्हटलंय. तसेच, या प्रकरणी पत्नीनं लावलेल्या बलात्काराच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
छत्तीसगडमधील बेमेतारा जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेनं तिच्या 37 वर्षीय पतीवर तिच्याशी इच्छेविरुद्ध जबरदस्तीनं लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. तसेच, पती आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोपही केला होता.
आपल्या तक्रारीत पत्नीनं म्हटलं की, 2017 मध्ये त्यांच लग्न झालं होतं. लग्नानंतर पतीनं इच्छेविरुद्ध अनेक वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि हुंड्यासाठी तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणात, बेमेटाराच्या सत्र न्यायालयानं पतीविरोधात कलम 498, 376, 377 आणि 34 अंतर्गत आरोप निश्चित केले होते. याविरोधात पतीनं उच्च न्यायालयात अर्ज केला होता.
कोर्टानं काय म्हटलं
आयपीसीच्या कलम 375 च्या अपवाद II वर अवलंबून न्यायमूर्ती एन.के.चंद्रवंशी यांनी या प्रकरणात कायदेशीररित्या दांपत्य विवाहित असल्यास, जबरदस्तीनं किंवा पत्नीच्या इच्छेविरुद्ध पतीकडून संभोग किंवा कोणतंही लैंगिक कृत्य बलात्काराचा गुन्हा ठरणार नाही, असा निर्वाळा दिला. परंतु, पत्नीच्या इतर आरोपांची चौकशी केली जाणार आहे.