मारहाण प्रकरणी माजी उपसरपंचासह पाच अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:24 IST2020-03-18T00:23:57+5:302020-03-18T00:24:21+5:30
आदिवासी समाजातील तरुणाला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नारे गावचे माजी उपसरपंच व शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सुधीर पाटील यांना त्यांच्या समर्थकासह वाडा पोलिसांनी अटक केली आहे.

मारहाण प्रकरणी माजी उपसरपंचासह पाच अटकेत
वाडा : तालुक्यातील नारे येथील आदिवासी समाजातील तरुणाला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नारे गावचे माजी उपसरपंच व शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सुधीर पाटील यांना त्यांच्या समर्थकासह वाडा पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा तालुक्यातील नारे या गावात फिर्यादी नवनाथ बागराव (२१) हा तरुण आपल्या कुटुंबासह राहत असून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. १४ मार्च रोजी रात्री जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन होते. या स्नेहसंमेलनात लहान मुलांचा कार्यक्र म आवडल्याने त्यांना फिर्यादी पैसे रूपाने बक्षिसाचे वाटप करत होता. याचा राग मनात धरून माजी उपसरपंच सुधीर पाटील यांनी फिर्यादीस गावाच्या बाहेरील शेतात बोलावून घेऊन अन्य साथीदार दिनेश मुकणे, दहेश मुकणे, मंगल वाघ, दीपक मुकणे यांनी कमरेचा पट्टा व हातातील दांडक्यांनी जबर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. फिर्यादी नवनाथला उपचारासाठी अंबाडीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.