दिल्लीपोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी सीरियल किलर असल्याचे समोर आले. तो त्याच्या तीन सहकाऱ्यांसह कॅब चालकांच्या हत्या करायचा आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह दरीमध्ये फेकून द्यायचे. आरोपीने चार कॅब चालकांची हत्या केल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. गेल्या काही वर्षात बेपत्ता झालेल्यांपैकी अनेक चालकांची हत्या यानेच केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मागील २५ वर्षांपासून पोलीस शोध घेत असलेला आरोपी अखेर जाळ्यात अडकला. आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अजय लांबा उर्फ बन्सी आहे. दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या दरोड्यात ४ जणांच्या हत्येप्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत होते.
कॅब चालकांना करायचे लक्ष्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय २००१ पासून त्याच्या साथीदारांसोबत मिळून दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील वेगवेगळ्या भागात कॅब चालकांना लक्ष्य करत होते.
आरोपी आणि त्याचे साथीदार कॅब करायचे. ती कॅब निर्जन असलेल्या ठिकाणी घेऊन जायचे. तिथे चालकाची हत्या करायचे. मृतदेह दरीमध्ये फेकून द्यायचे आणि पैसे, गाडी घेऊन पळून जायचे. चोरलेल्या गाड्या आरोपी नेपाळमध्ये नेऊन विकायचे.
कोण आहे सीरियल किलर अजय लांबा?
अजय हा मूळचा दिल्लीतील कृष्णा नगर परिसरात राहायचा. १९७६ मध्ये त्याचा जन्म झाला होता. सहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. सहावीनंतरच त्याने गुन्हेगारीच्या विश्वात पाऊल ठेवले. विकासपुरी पोलीस ठाण्यात बन्सी म्हणून तो वाँटेंड होता.
१९९६ मध्ये त्याने अजय लांबा असे नाव बदलले. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये राहायला गेला. १९९९ ते २००१ दरम्यान त्याने चार हत्या केल्या. दरोड्याच्या प्रकरणात पोलीस त्याचा शोध घेत होते.
आरोपी लांबा नेपाळमध्येही राहिला आहे. तो तिथे गांजा तस्करीही करायचा. २००८ ते २०१८ पर्यंत तो नेपाळमध्ये होता. त्यानंतर तो देहारादूनला आला. कुटुंबासोबत राहत होता.