गोळीबारातील जखमी व्यक्तीचा अखेर मृत्यू; गावच्या संपत्तीच्या वादातून हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 00:53 IST2020-08-25T00:52:49+5:302020-08-25T00:53:05+5:30
उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली

गोळीबारातील जखमी व्यक्तीचा अखेर मृत्यू; गावच्या संपत्तीच्या वादातून हल्ला
भिवंडी : उत्तर प्रदेशमधील कर्नलगंज, फुलपूर या गावातील घर व शेतजमिनीच्या वादातून मामाने एक भाचा, भाऊ, मेहुणे आदींना सोबत घेऊन संपत्तीमध्ये अडथळा ठरणाऱ्या भाच्यावर बंदुकीच्या चार गोळ्या झाडून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुलजारनगर येथील याकूब शेठच्या बिल्डिंगसमोर गुरुवारी रात्री घडली होती. यावेळी जखमी झालेले अब्दुल सत्तार मोहम्मद इब्राहिम मन्सुरी (६५, रा. गुलजारनगर) यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर, रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशमधील गावातील घर आणि जमिनीच्या आईच्या हिश्श्यावरून अब्दुल सत्तार मन्सुरी यांचा मामासोबत काही वर्षांपासून वाद होता. त्यातून त्यांचे मामा सिराज ऊर्फ सोनू मुस्तफा मन्सुरी, वकील मन्सुरी, शकील मन्सुरी, इस्तियाक मन्सुरी यांनी कट रचून भाचा अब्दुल रज्जाक मोहम्मद इब्राहिम मन्सुरी, मेहुणे इसरार मोमीन, मुमताज अन्सारी आदींच्या साथीने अब्दुल सत्तार मन्सुरी हे त्यांच्या मेडिकलमधून रात्री घरी जात असताना त्यांच्यावर बंदुकीतून चार गोळ्या झाडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात अब्दुल सत्तार मन्सुरी हे गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला.
दोन मुख्य आरोपींना २७ पर्यंत पोलीस कोठडी
याप्रकरणी शांतीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीच या घटनेतील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील अब्दुल रजाक मोहम्मद इब्राहिम मन्सुरी व इसरार अहमद यार मोहम्मद मोमीन या दोन मुख्य हल्लेखोरांना २७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, अन्य पाच हल्लेखोरांनाही पोलिसांनी अटक केली आहे.