फायटर, सळईसह दगडाने तरुणावर प्राणघातक हल्ला, अजंग शिवारातील घटना, चौघांवर गुन्हा
By देवेंद्र पाठक | Updated: November 17, 2023 16:55 IST2023-11-17T16:55:18+5:302023-11-17T16:55:33+5:30
याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला.

फायटर, सळईसह दगडाने तरुणावर प्राणघातक हल्ला, अजंग शिवारातील घटना, चौघांवर गुन्हा
धुळे : दुचाकीचा कट मारल्याच्या कारणावरून तरुणाला लोखंडी फायटर, सळईसह दगडाने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना धुळे तालुक्यातील अजंग शिवारात बुधवारी घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला.
महेश मोतीलाल माळी (वय ४५, रा. अजंग, ता. धुळे) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, माेटारसायकलचा कट का मारला असे निमित्त करून तीन ते चार जण महेश माळी यांच्या घराजवळ एकत्र आले. शिवीगाळ करत माळी यांना घराबाहेर बोलावून त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. वाद घालत त्यांना शिवीगाळ केली. हाताबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर लोखंडी फायटर, लोखंडी सळई आणि दगडाने मारहाण करण्यात आली. यात त्यांच्या हात-पायांसह तोंडाला, पाठीला गंभीर दुखापत झाली.
ही घटना बुधवारी सकाळी साडेआठ ते ९ वाजेच्या सुमारास घडली. जिवे ठार मारण्याची धमकी देऊन चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर गंभीर दुखापत झालेल्या महेश मोरे यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर महेश मोतीलाल माळी धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, चार जणांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कांबळे तपास करत आहेत.