तळेगाव दाभाडे : वराळेफाटा येथे भाजपच्या दोन गटात हाणामारी होऊन तिघेजण जखमी झाले आहेत.दोन्ही गटावर गुन्हे दाखल झाले. ही घटना गुरूवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.प्रतीक नारायण भेगडे(वय २४,रा.तळेगाव दाभाडे,ता.मावळ,जि.पुणे)यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, तळेगाव दाभाडे येथून अनिकेत भेगडे यांच्याबरोबर मंगरूळ येथे गुरुवारी रात्री मोटारीने जात असताना वराळेफाटा येथे खड्डयात साचलेले पावसाचे पाणी पायी जात असलेल्या कल्पेश मराठे यांच्या अंगावर उडाले.'तुम्हाला कसला माज आला आहे,तुम्ही भेगडे आहात.तुमचा माज उतरवतो, असे म्हणून आम्हा दोघांच्या पोटावर,पाठीवर ,पायावर मंडपाच्या बांबूने मारहाण करून गळ्यातील दोन तोळे सोन्याची चैन हिसकावून घेतली.शिवीगाळ केली.'
..................
माझा कार्यकर्ता कल्पेश मराठे याला बेदम मारहाण करण्यात राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या कुटुंबातील सदस्याचा सहभाग आहे. मावळची जनता दादागिरी व दडपशाई खपवून घेणार नाही. निवडणूक लोकशाही मार्गाने व प्रेमाने लढवावी. माझे व माझ्या कार्यकर्त्यांचे काही बरेवाईट झाल्यास त्यास राज्यमंत्री बाळा भेगडे यांना जबाबदार धरावे. पोलिस खात्याने सत्तेच्या बळावर दडपण टाकण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही---सुनील शेळके , माजी उपनगराध्यक्ष.
...............
वराळे येथे घडलेली घटना ही वाईट व दु:खदायक आहे. कल्पेश मराठे हा आपलाही नातेवाईक आहे. रस्त्याने मोटारीतून जाताना पाणी उडाल्याच्या किरकोळ कारणावरून भांडणाला सुरवात झाली. शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्यातून मारामारी झाली.त्यामागे कोणतेही राजकीय कारण नाही. वैयक्तिक भांडणाला राजकीय रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. मावळ हा शांतताप्रिय तालुका असून सर्वांनी संयमाने वागून शांतता अबाधित ठेवण्यास सहकार्य करावे. राज्यमंत्री बाळा भेगडे