महराजगंज - उत्तर प्रदेशच्या महराजगंजमध्ये लग्नाच्या १० दिवसांनीच हनीमून ट्रिपला गेलेल्या कपलमध्ये हाय व्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. गोवा फिरायला गेलेल्या नवविवाहित जोडप्यामध्ये काही कारणावरून भांडण झाले त्यानंतर संतापलेली पत्नी पतीला सोडून फ्लाईटहून तिच्या माहेरी आली. या प्रकारानंतर नवविवाहिता व तिच्या घरच्यांनी डॉक्टर पतीसह ७ जणांवर मारहाण, हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, तक्रारदार पत्नी ही कोतवाली परिसरात राहणारी आहे. तिने पोलिसांना सांगितले की, मागील १२ फेब्रुवारीला माझं लग्न चमनगंज पूल परिसरात राहणाऱ्या रत्नेश गुप्तासोबत हिंदू परंपरेनुसार झालं. लग्नानंतर पती आणि त्याच्या घरच्यांनी माझा छळ केला. त्यानंतर माहेरची काही माणसे सासरच्यांना समजवण्यासाठी आली होती. दोन्ही कुटुंबातील लोकांच्या मध्यस्थीने वादावर तोडगा काढण्यात आला आणि त्यानंतर प्रकरण शांत झाले असं तिने म्हटलं.
त्यानंतर १९ फेब्रुवारीला नवविवाहिता तिच्या डॉक्टर पतीसोबत गोवा इथं फिरायला गेली. याठिकाणी हनीमूनसाठी आलेल्या पतीने पत्नीला मारहाण केली. हा प्रकार पत्नीने तिच्या माहेरी सांगितला तेव्हा तिला २२ फेब्रुवारीला फ्लाईटमधून गोव्यातून घरी बोलवण्यात आले. कोतवाली इथं नवविवाहिता तिच्या घरी पोहचल्यानंतर घरच्यांनी आणि पत्नीने पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणात पती आणि ७ जणांवर पत्नीचा छळ, हुंड्यासाठी दबाव टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने गोव्यात झालेल्या मारहाणीचा प्रकार पोलिसांना सांगितला.
दरम्यान, पतीने माझा गळा दाबून मला मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप पत्नीने केला आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांनी मारहाण, हुंड्यासाठी छळ हे कलम नोंदवले आहेत. तक्रारीच्या आधारे पती आणि त्याच्या घरच्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे असं पोलीस अधीक्षक सोमेंद्र मीना यांनी सांगितले.