Female doctor sues ragging; Trial against three accused | रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 
रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

ठळक मुद्देनायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 मुंबई - तीन महिला सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रँगिंगला कंटाळून डॉ.पायल सलीम तडवी (३०)  यांनी गळफास घेऊन नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तीन महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याच्या अधिक तपास सुरु असल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगवणे यांनी दिली.  


टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात दुसऱ्या वर्षात (एम.डी) शिक्षण घेत असलेल्या डॉ.पायल तडवी यांना वरिष्ठ असलेल्या सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती महिरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघांकडून मानसिक त्रास आणि अपमानित केले जात होते. याला कंटाळून पायलने टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली. पायलचे फेब्रुवारी २०१६ साली सलमान तडवी यांच्या लग्न झाले. सलमान सध्या कूपर रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. ते मूळचे भुसावळच्या रावेर येथील आहेत. पायलने यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टर म्हणून काम केले आहे. तीन महिला डॉक्टरांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Web Title: Female doctor sues ragging; Trial against three accused
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.