हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रात्री एका तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन तरुणांनी कारमध्ये बसवलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. क्रूरतेची सीमा ओलांडत आरोपींनी पीडितेला चालत्या गाडीतून रस्त्यावर फेकून दिलं, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. पहाटे पाचच्या सुमारास तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
२६ वर्षीय पीडित तरुणीने 'एबीपी न्यूज'शी बोलताना आपबिती सांगितली आहे. पीडितेने स्पष्ट केले की, ती त्या नराधमांना आधीपासून ओळखत नव्हती. आईशी भांडण झाल्यामुळे ती रागात घराबाहेर पडली होती. "ज्यांनी मला लिफ्ट दिली, त्यांना मी ओळखत नव्हते. मला पाहून त्यांनी गाडी थांबवली आणि म्हणाले- हे घे ६०० रुपये, तू खूप काळजीत दिसतेयस. मला कल्पना नव्हती की ते चुकीच्या कामासाठी पैसे देत आहेत. त्यांनी मला पेटीएमद्वारे पैसे पाठवले."
"मी त्यांना सांगितलं होतं की, जेवढे भाडं होईल तेवढे मी देईन, मला फक्त मशिदीजवळ सोडा. माझं घर मशिदीजवळच आहे. पण त्यांनी गाडी दुसऱ्या बाजूला वळवली. त्यांनी गाडी लॉक केली आणि माझा फोन स्वतःकडे काढून घेतला जेणेकरून मी कोणाला फोन करू शकणार नाही. रात्री १२:३० वाजता मी गाडीत बसले होते.
"२:३०-३:०० वाजेपर्यंत ते मला कुठे कुठे घेऊन गेले, मला काहीच समजलं नाही. रात्री सुमारे ३ वाजता त्यांनी मला राजा चौकात धक्का देऊन बाहेर फेकलं. त्यावेळी खूप दाट धुकं होतं, काहीच दिसत नव्हते. जेव्हा ते मला फेकून देण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी तिथे पोलीस किंवा इतर कोणीही नव्हतं. त्यांनी सुरुवातीला पैसे दिल्यावर मला मारलं."
"मला मागच्या सीटवर झोपवलं, एक जण बाहेर गेला आणि दुसऱ्याने माझ्यावर अत्याचार केला. डोंगराळ भागात गाडी थांबवून त्यांनी आळीपाळीने माझ्यावर बलात्कार केला. जीवे मारण्याची धमकीही दिली. आम्ही सांगतोय ते निमूटपणे कर, नाहीतर तुला गुडगावच्या दरीत फेकून देऊ" असं पीडित तरुणीने म्हटलं आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.