Haryana Crime: हरियाणातील फरीदाबादमध्ये एका अत्यंत क्रूर हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. ज्या घटनेला दोन महिन्यांपासून रेल्वे अपघात समजले जात होते, तो प्रत्यक्षात एक खून असल्याचे तपासात समोर आले आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिला. तब्बल दोन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
झारखंडचा रहिवासी असलेला सुमन (वय ३०) हा फरीदाबादमध्ये रिक्षा चालवून आपल्या कुटुंब चालवत होता. १ डिसेंबर २०२५ रोजी मेवाडा महाराजपूर भागात रेल्वे रुळावर एका व्यक्तीचा छिन्नविछिन्न मृतदेह पोलिसांना आढळला होता. मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे चिरडलेला असल्याने सुरुवातीला पोलिसांनी हा एक अपघाती मृत्यू असावा, असा अंदाज बांधला आणि अपघाताची नोंद केली.
भावाच्या तक्रारीमुळे गुपित उघडलं
सुमारे दोन महिने उलटल्यानंतर १८ जानेवारी रोजी सुमनचा भाऊ सनी याने सूरजकुंड पोलीस ठाण्यात आपला भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तपासादरम्यान पोलिसांनी शवविच्छेदन गृहात जतन करून ठेवलेल्या मृतदेहाची माहिती सनीला दिली. कपडे आणि शरीराच्या खुणांवरून सनीने तो मृतदेह सुमनचाच असल्याचे ओळखले. त्याने आपल्या वहिनीवर आणि तिच्या एका परक्या पुरुषासोबत असलेल्या संबंधांवर संशय व्यक्त केला.
अनैतिक संबंध आणि खूनाचा कट
पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. सुमनला त्याची पत्नी अंजनी आणि पश्चिम बंगालच्या मालदा येथील रियाजुल यांच्यातील अननैतिक संबंधांची कुणकुण लागली होती. यामुळे घरात सतत भांडणे होत होती. आपल्या मार्गातील हा अडथळा दूर करण्यासाठी अंजनी आणि रियाजुल यांनी सुमनचा काटा काढण्याचे ठरवले.
दगडाने ठेचलं अन् रुळावर फेकलं
३० नोव्हेंबरच्या रात्री आरोपींनी सुमनला दारू पिण्याच्या बहाण्याने रेल्वे रुळाजवळ बोलावले. तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि मोठ्या दगडाने त्याच्या डोक्यावर वार करून त्याची हत्या केली. तो रेल्वे अपघातात मेला आहे असे भासवण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह रुळावर टाकला आणि ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा रुळावर अशा प्रकारे ठेवला की जेणेकरून जाणाऱ्या ट्रेनमुळे तो पूर्णपणे चिरडला जाईल.
गुन्हा केल्यानंतर आरोपी पत्नी अंजनी काही दिवस झारखंडला पळून गेली होती, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि चौकशीच्या जोरावर अंजनी (२९) आणि रियाजुल (३०) या दोघांना अटक केली. या दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. सुमन आणि अंजनी यांच्या लग्नाला १५ वर्षे झाली असून त्यांना दोन मुले आहेत.
Web Summary : In Faridabad, a woman and her lover murdered her husband, disguising it as a train accident. They disposed of his body on railway tracks to conceal their crime. Police arrested both after a two-month investigation revealed the truth.
Web Summary : हरियाणा के फरीदाबाद में एक महिला और उसके प्रेमी ने पति की हत्या कर दी, जिसे ट्रेन दुर्घटना का रूप दिया। अपराध छिपाने के लिए शव रेलवे ट्रैक पर फेंका। दो महीने बाद पुलिस ने दोनों को गिरफ्तार किया।