जयपूर - राजस्थान कॅडरचे २ ज्येष्ठ IAS अधिकाऱ्यांमधील कौटुंबिक कलह आता सगळ्यांसमोर आला आहे. २०१४ च्या बॅचमधील महिला आयएएस अधिकारी भारती दीक्षित यांनी पती आशिष मोदी यांच्याविरोधात जयपूरच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भारती यांनी पतीवर घरगुती हिंसाचार, मारहाण, अवैधपणे बंधक बनवणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि बळजबरीने घटस्फोटासाठी दबाव टाकणे यासारखे गंभीर आरोप केले आहेत.
सध्या हे प्रकरण प्रशासनात चर्चचा विषय बनला आहे. कारण दोघेही पती-पत्नी उच्चपदस्थ अधिकारी आहेत. भारती दीक्षित सध्या वित्त विभागात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत तर आशिष मोदी सामाजिक न्याय विभागात संचालक आहेत. पोलिसांनी भारती यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तपासासाठी टीम बनवण्यात आली आहे. दोन्ही बाजूचे जबाब, साक्षीदार आणि पुरावे यांची पडताळणी सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
या वादाचं कारण म्हणजे १४ ऑक्टोबर २०२५ रोजी एक घटना घडली. भारती दीक्षित यांनी सांगितले की, मी सकाळी माझ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. रस्त्यात आशिष मोदी आणि त्यांच्या आणखी एका साथीदाराने सरकारी वाहनाचा वापर करून मला जबरदस्तीने त्यात बसवले. त्यानंतर शहरातील एका निर्जनस्थळी असलेल्या इमारतीच्या फ्लॅटमध्ये मला कित्येक तास बंधक बनवले. आशिष मोदी यांनी त्यावेळी दारू प्यायली होती. ते मला शिवीगाळ करत होते. त्यावेळी आशिष मोदी यांनी बळजबरीने माझ्याकडून कागदावर स्वाक्षरी करून घेत घटस्फोटासाठी दबाव टाकला असा आरोप केला. जेव्हा स्वाक्षरी करण्यास नकार दिला तेव्हा एका शूटरला बोलावून मला जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नाही तर बंदुकीच्या धाकावर माझ्या वडिलांसोबत मला खोटे बोलण्यास भाग पाडले. माझी प्रतिमा मलिन होईल अशा शब्दात मला धमकावण्यात आले, माझा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न केला असेही भारती यांनी सांगितले.
इमोशनल ब्लॅकमेल करत केले लग्न
२०१६ मध्ये मला इमोशनल ब्लॅकमेल करत माझ्याशी लग्न करण्यात आले. माझ्या वडिलांची तब्येत बिघडली होती. आशिष मोदी यांनी त्याचा फायदा घेत माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकला. लग्नानंतर मला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले. आशिष मोदी यांचे अनेक महिलांशी संबंध आहेत. ज्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. वारंवार घटस्फोटासाठी माझ्याकडे दबाव टाकत होता, परंतु मी नकार देत असल्याने हिंसाचार वाढत गेला असं भारती दीक्षित यांनी म्हटलं.
दरम्यान, संबंधित प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे मी यावर काय बोलणार नाही. पोलिसांना तपासात सहकार्य करेन असं सांगत आशिष मोदी यांनी पत्नीने केलेले आरोप फेटाळले. जेव्हा माझ्यावर FIR दाखल करण्यात आला तेव्हा मी बिहार दौऱ्यावर होतो असंही त्यांनी सांगितले. आता तपासात भारती यांचे पुरावे किती खरे आहेत, आशिष मोदी त्यांची बाजू कशी मांडतात हे कोर्टात दिसेल. सध्या पोलीस या हायप्रोफाईल कौटुंबिक वादावर तपास करत आहेत.