नकली नोटा प्रकरण : एमआयएमचा माजी जिल्हाध्यक्ष शहजादखानला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:19 IST2022-03-16T15:18:53+5:302022-03-16T15:19:19+5:30
मुख्य आरोपी इरफान हनीफ पटनी मूळ रा. गुजरात ह.मु.वडनेर (भोलजी) याच्यासह खामगाव, मलकापूर, नांदुरा येथून सहा आरोपींना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

नकली नोटा प्रकरण : एमआयएमचा माजी जिल्हाध्यक्ष शहजादखानला अटक
मलकापूर (बुलडाणा) : मलकापूर शहरातील एचडीएफसी बँकेत नकली नोटा जमा करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीनंतर एमआयएमचा माजी जिल्हाध्यक्ष, नगरसेवक शहजाद खान सलिम खान (३८) याला बुधवारी पहाटे ३ वाजता पोलिसांनी नकली नोटांसह अटक केली. दुपारनंतर त्याला न्यायालयासमोर उपस्थित केले जाणार आहे. आतापर्यंत या आरोपींची संख्या सात झाली आहे.
बँकेत पाचशे रुपये मूल्याच्या ३८ नोटा जमा केल्याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी मुख्य आरोपी इरफान हनीफ पटनी (मूळ रा.गुजरात, ह.मु.वडनेर भोलजी) तर खामगाव सजनपुरी येथील इमरान साहेर शेख मोहम्मद ऊर्फ बबलू या दोघांना अटक केली होती. त्यांना दोनवेळा पोलीस कोठडी देण्यात आली. कोठडीदरम्यान या गुन्ह्यात ताहेर अहमद जमीर अहमद (३१, रा.पेठ मोहल्ला नांदुरा), मोहम्मद वसीम मोहम्मद नदीम (२१, रा.गांधी चौक मलकापूर) या दोघांची नावे पुढे आली. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. त्या दोघांकडून पाचशे रुपयांच्या प्रत्येकी दोन-दोन नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या. त्या दाेघांना १२ मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली. त्यांच्या कोठडीदरम्यान आणखी माहिती पुढे आली.
मुख्य आरोपी इरफान हनीफ पटनी मूळ रा. गुजरात ह.मु.वडनेर (भोलजी) याच्यासह खामगाव, मलकापूर, नांदुरा येथून सहा आरोपींना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आता बुधवारी पहाटे ३ वाजता शहर पोलिसांनी एमआयएमचा माजी जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक शहजाद खान सलीम खान, रा. मालीपुरा मंगलगेट मलकापूर याला नकली नोटांसह अटक केली.
दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करणार केले जाणार आहे. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात एपीआय स्मिता म्हसाये करीत आहेत.