Indian Air Force engineer News: २५ वर्षीय लोकेश पवन कृष्णा हा तरुण बहीण लक्ष्मीच्या घरी आला होता. घरात बोलणं सुरू असतानाच लोकेशला राग आला आणि २४व्या मजल्यावरून त्याने उडी मारून आत्महत्या केली. रविवारी बंगळुरूमध्ये ही घटना घडली.
प्रस्टिज जिंदल सिटी अपार्टमेंट्समध्ये बहीण लक्ष्मी राहते. तिलाच भेटायला लोकेश आला होता. लोकेश भारतीय हवाई दलामध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. हलसुरू येथील लष्करी शासकीय निवासस्थानात तो राहायला होता.
लोकेश शनिवारी लक्ष्मीच्या घरी आला होता. रविवारी घरात गप्पा सुरू असतानाच कुठल्यातरी गोष्टीचा लोकेश राग आला. त्यानंतर त्याने रागाच्या भरातच २४व्या मजल्यावरून खाली उडी मारली.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून, लोकेशने आत्महत्या का केली, याचा तपास सुरू केला आहे.
पोलीस लोकेशच्या कुटुंबियांची आणि त्याच्या बहिणीचीही चौकशी करणार आहे. लोकेशने आत्महत्या करण्यापूर्वी कोणत्या विषयावर चर्चा झाली. लोकेशला कोणत्या गोष्टीचा राग आला होता, या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.
सीए महिलेने मुलासह १३व्या मजल्यावरून मारली उडी
दोन दिवसांपूर्वीच दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये अशीच घटना घडली होती. एका सीए असलेल्या महिलेने तिच्या ११ वर्षाच्या मुलासह १३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.
महिलेने तिच्या पतीसाठी सुसाईड नोटही लिहिली होती. मुलगा मतिमंद होता आणि त्यामुळे महिला खूपच त्रस्त होती. या त्रासाला कंटाळून महिलेने आधी मुलाला ढकलले आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली.