खामगावात आंतरधर्मीय विवाह करण्याचा अकोल्यातील युवकाचा प्रयत्न उधळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 14:20 IST2018-07-07T14:15:35+5:302018-07-07T14:20:10+5:30
अकोला : शहरातील एका विवाहित युवकाचा जठारपेठेतील २२ वर्षीय युवतीसोबत आंतरधर्मीय विवाह करण्याचा प्रयत्न खामगावातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी उधळून लावला आणि जोडप्याला खामगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

खामगावात आंतरधर्मीय विवाह करण्याचा अकोल्यातील युवकाचा प्रयत्न उधळला!
अकोला : शहरातील एका विवाहित युवकाचा जठारपेठेतील २२ वर्षीय युवतीसोबत आंतरधर्मीय विवाह करण्याचा प्रयत्न खामगावातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी उधळून लावला आणि जोडप्याला खामगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांच्या माहितीनुसार, अकोल्यात राहणारा आसिफ खान नुर खान (३२) हा विवाहित असून, त्याला तीन मुली आणि दोन मुले आहेत. त्याने पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान, त्याने जठारपेठमध्ये राहणाऱ्या एका २२ वर्षीय युवतीला प्रेमजाळ्यात ओढले आणि तिला लग्नाचे आमिष दाखविले. युवती लग्न करण्यासाठी तयार झाल्यामुळे तो कोर्ट मॅरेज करण्याच्या उद्देशाने खामगाव न्यायालयात घेऊन आला. खामगाव बसस्थानकावरून आॅटोरिक्षाने न्यायालयात जात असताना आॅटोरिक्षा चालकास आसिफ खानचा संशय आला. आॅटोरिक्षा चालकाने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संपर्क करून त्यांना घटनेची माहिती दिली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने न्यायालय परिसरात पोहोचून आसिफ खान नुर खान याच्यासह युवतीला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे आंतरधर्मीय विवाह उधळल्या गेला. या ठिकाणी आसिफ खान याची पत्नी शमीना परवीन हीसुद्धा पोलीस ठाण्यात पोहोचली. आसिफ खान याच्याविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. युवतीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. (प्रतिनिधी)