रॉयली प्लॉटस्थित कॅफेआड 'दम मारो दम', क्राईम वनची हुक्का पार्लरवर धाड
By प्रदीप भाकरे | Updated: September 1, 2024 14:41 IST2024-09-01T14:40:41+5:302024-09-01T14:41:47+5:30
गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे अधिकारी व अंमलदार कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना रॉयली प्लॉटस्थित साक्षी कॅफे ॲंड रेस्टॉरंट येथे हुक्का पार्लरमार्फत तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन सुरू असल्याची माहिती मिळाली.

रॉयली प्लॉटस्थित कॅफेआड 'दम मारो दम', क्राईम वनची हुक्का पार्लरवर धाड
अमरावती : रॉयली प्लॉटस्थित साक्षी कॅफे ॲंड रेस्टारंटमध्ये कॅफेआड चालणाऱ्या हुक्का पार्लरवर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने धाड घातली. शनिवारी रात्री तेथून हुक्क्याचा ‘दम’ मारणाऱ्या चार तरूणांसह संचालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरूद्ध सिटी कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे अधिकारी व अंमलदार कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना रॉयली प्लॉटस्थित साक्षी कॅफे ॲंड रेस्टॉरंट येथे हुक्का पार्लरमार्फत तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन सुरू असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे, तेथील दुसऱ्या माळ्यावर धाड घातली असता साक्षी कॅफे ॲंड रेस्टॉरंटचामालक प्रणव प्रमेंद्र शर्मा (२६, रा. राॅयली प्लॉट) हा धुम्रपान व सेवनाकरिता तंबाखूजन्य पदार्थाची विक्री व सेवन करण्यास सहाय्य करतांना विनापरवाना मिळून आला. तसेच तेथे मोहीत सुनिलकुमार फलवाणी (२१, रा. कृष्णा नगर), प्रथमेश मनोजराव मसांगे (१८, रा. गाडगेनगर), पियुष सुनिल बसंतवाणी (२१, रा. कृष्णा नगर) हे हुक्का पिताना आढळून आले.
आरोपी प्रणव शर्मा याच्याकडून २१०० रुपये किमतीचा हुक्का पॉट, पानरस फ्लेवरचे छोटे पॅकेट, फ्लेवरचे डबे व सहा मॅजिक कोल पॅकेट असा ३२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना पुढील कारवाईसाठी सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखा युनिट एकचे प्रमुख तथा वरिष्ठ पोलीस निरिक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरिक्षक मनीष वाकोडे यांच्या टिमने ही कारवाई केली. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी रात्रीदेखील राजहिलनगर येथील एका फ्लॅटमध्ये चालणाऱ्या हुक्का पार्लरचा तेथील स्थानिक लोकांनी पर्दाफाश केला होता. त्यानंतर राजापेठ पोलिसांनी तेथून हुक्कासाहित्य जप्त केले होते.
शहरातील शाळा, कॉलेज व इतर ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री तसेच अमंली पदार्थ बाळगणारे, विकणारे तसेच सेवन करणाऱ्यांविरूदध धडक मोहिम राबविली जात आहे. युवावर्गाला नशामुक्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असून, त्याबाबत शाळा, कॉलेज व इतर गर्दीच्या ठिकाणी बैठकी व कार्यशाळा घेण्यात येत आहेत.
- नवीनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त