महागडया कारमधील टेप चोरी करणाऱ्या दुकलीला अटक, ६ गुन्ह्यांची उकल करून ६ चोरीचे कारटेप केले हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:52 IST2023-04-03T17:51:59+5:302023-04-03T17:52:10+5:30
महागडया कारमधील टेप चोरी करणाऱ्या दोन आरोपी महिलांना अटक करून सहा गुन्ह्यांची उकल

महागडया कारमधील टेप चोरी करणाऱ्या दुकलीला अटक, ६ गुन्ह्यांची उकल करून ६ चोरीचे कारटेप केले हस्तगत
नालासोपारा (मंगेश कराळे) :-
महागडया कारमधील टेप चोरी करणाऱ्या दोन आरोपी महिलांना अटक करून सहा गुन्ह्यांची उकल करून चोरीचे सहा कार टेप हस्तगत करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. ही माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी सोमवारी दिली आहे.
विरार येथे राहणारे सौमील संदीप मनकीकर यांची वॅगनॉर कार राहत्या घराचे परिसरात पार्क केली होती. २४ मार्चला रात्री आरोपीने कारच्या डाव्या बाजुची समोरच्या सीटजवळील काच फोडुन नुकसान करत गाडीमधील एल.ई.डी म्युझिक सिस्टीम चोरून नेली होती. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात गेल्या काही महिन्यापासुन महागडया कारची काच फोडुन कारमधील म्युझिक सिस्टीम / टेप चोरी केलेबाबत पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सुचना व मार्गदर्शन केले होते. सदर दाखल गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांनी गुन्हे शाखा कक्ष तीन विरार यांच्याकडे सोपविला होता.
गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाव्दारे प्राप्त माहितीच्या आधारे महिला आरोपी अंजु मुकेश वधानी आणि सरीता गणेश लिंगम या दोघांना ३० मार्चला बिलालपाडा येथून ताब्यात घेतले. महिला आरोपींनी नमुद गुन्हा हा विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे मदतीने केले असल्याची निष्पन्न झाले. अटक महिला आरोपीत यांचेकडुन गुन्हा करणेकरीता वापरण्यात आलेली दुचाकी व चोरी केलेले ६ म्युझिक सिस्टीम / कारटेप असा एकुण १ लाख ६ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून ६ गुन्हे उघडकीस केले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, शंकर शिंदे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव, कविता पांढरे, संतोष चव्हाण यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.