वास्को - गांधीनगर, वास्को परिसरात राहणारा चार वर्षीय रौनिक पटेल नावाचा चिमुकला मुलगा याच परिसरात असलेल्या श्री कन्ठेश्वरनाथ मंदिरात खेळत असताना आत असलेल्या भूमीगत पाण्याच्या टाकीत पडल्याने आज दुपारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंदिरात खेळताना रौनिकने या भूमीगत पाण्याच्या टाकीचे झाकण काढून तो आत वाकला असता तो त्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गांधीनगर, वास्को भागात राहणारा रौनिक हा मुलगा खेळता - खेळता कण्ठेश्वरनाथ मंदिरात पोचल्यानंतर त्यांनी येथे असलेल्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडले. आत काय आहे हे पाहण्यासाठी तो वाकला असता त्याचा तोल गेल्याने या पाण्याच्या टाकीत तो पडून बुडाला. चार वर्षाचा मुलगा पाण्याच्या टाकीत बुडत असल्याचे या भागात राहणाऱ्या २५ वर्षीय रवी गवंडर या तरुणाला समजताच त्यांने त्वरित धाव घेऊन पाण्यात बुडत असलेल्या रौनिकला बाहेर काढला. यानंतर त्याला लोकांनी उपचारासाठी चिखली येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, दाखलपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहीती डॉक्टरांनी दिली. या घटनेची माहीती मिळताच वास्को पोलीसांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन या प्रकरणाचा पंचनामा केला. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक निहंदा तावारीस यांनी संपर्क केला असता या प्रकरणाचा तपास चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
मंदिराच्या भूमीगत पाण्याच्या टाकीत बुडून चार वर्षीच चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 18:25 IST