दारू पिऊन दुचाकी चालवली; एक महिन्याचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:18 IST2025-10-09T09:17:58+5:302025-10-09T09:18:08+5:30
Drunk and Drive Case: १५ हजारांचा दंड भरण्यास नकार, कारागृहात रवानगी

दारू पिऊन दुचाकी चालवली; एक महिन्याचा कारावास
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दारूच्या नशेत माेटारसायकल चालविणाऱ्या स्वप्निल दशरथ निघोट (२४, रा. नवी मुंबई) याला ३० दिवसांच्या कैदेची शिक्षा ठाणे न्यायालयाने मंगळवारी सुनावली. मद्य प्राशन केल्याबद्दल दहा हजारांचा आणि विनापरवाना माेटारसायकल चालविल्याबद्दल पाच हजारांचा असा १५ हजारांचा दंड न्यायालयाने केला. हा दंड त्याने न भरल्याने त्याला शिक्षा सुनावल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेने बुधवारी दिली. त्याची ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
काय आहे प्रकरण?
निघाेट हा ३ ऑक्टाेबर राेजी दुपारी १:१५ वाजण्याच्या सुमारास ठाण्याकडे येत असतांना तीन हात नाका येथे त्याला नाैपाडा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी विना हेल्मेट असल्याने अडविले. त्यावेळी त्याने मद्य प्राशन केल्याचेही आढळले. त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ (दारू पिऊन वाहन चालविणे) तसेच कलम ३(१) १८१ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
दारू पिऊन वाहन चालविणे गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे अपघात, कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी मद्य प्राशन करून वाहन चालवू नये.
- पंकज शिरसाट, उपायुक्त, वाहतूक शाखा