लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजकीय घोंगडे पांघरुण गुन्हेगारी करणारा कुख्यात गुंड मंगेश कडव अद्यापही फरारच आहे. मात्र त्याच्या वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वृत्त लिहिस्तोवर त्याची कसून चौकशी सुरू होती.मंगेश कडवविरुद्ध तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून, आणखी चार तक्रारदार पोलिसांकडे पोहोचले आहेत. त्यांची कागदपत्रे तपासून कडवने त्यांची कशाप्रकारे फसवणूक केली, त्याची पोलिस चौकशी करीत आहेत. दुसरीकडे कडवला शोधण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके कामी लागली आहेत. ही पथके त्याचा जागोजागी शोध घेत आहेत.फरार असलेल्या कडवने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. मात्र आज शनिवारी त्याच्या वकिलांनी अर्ज मागे घेतल्याने तो आता आत्मसमर्पण करू शकतो, असे बोलले जात आहे. दरम्यान, फरार असलेला कडव त्याची मालमत्ता आणि अवैध मालमत्तेची कागदपत्रे साथीदारांच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी धडपडत असल्याची सूत्रांची माहिती आहे.पोलिसांच्याही कानावर हे वृत्त आले आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कडवचा विश्वासू वाहनचालक आकाश वानखेडे याला शनिवारी ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्याची चौकशी सुरू होती. कडवची आणखी किती वाहने आहेत आणि तो कुठे कुठे असू शकतो, तो नेहमी कुठे जायचा, याबाबत वाहनचालकाला विचारपूस केली जात आहे. कडव नेहमी या वाहनचालक वानखेडेला इकडे-तिकडे घेऊन जात होता. त्यामुळे त्याच्याकडून कडवचा धागादोरा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कडव याच्या विरोधातील गट सक्रिय झाला असून, त्याचा पत्ता शोधून देण्यासाठीही या गटातील मंडळीसुद्धा धावपळ करीत असल्याची माहिती आहे.लाल मर्सिडिज गायबकडवकडे अनेक आलिशान वाहने आहेत. त्यापैकी पोलिसांनी १७ लाखांची हार्ले डेव्हिडसन ही दुचाकी आणि ४५ लाखाची मर्सिडिज तसेच अन्य काही वाहने जप्त केली. मात्र त्याच्याकडे एक लाल रंगाची मर्सिडिज कार असून, गुन्हा दाखल झाल्यापासून मंगेशसोबत ती कारही कुणाला दिसलेली नाही. त्यामुळे या कारमध्येच राहून मंगेश कडव इकडे-तिकडे लपत फिरत असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
कुख्यात कडवचा वाहनचालक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 00:26 IST
राजकीय घोंगडे पांघरुण गुन्हेगारी करणारा कुख्यात गुंड मंगेश कडव अद्यापही फरारच आहे. मात्र त्याच्या वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वृत्त लिहिस्तोवर त्याची कसून चौकशी सुरू होती.
कुख्यात कडवचा वाहनचालक ताब्यात
ठळक मुद्देपोलिसांकडून कसून चौकशी : जागोजागी शोध