म्हापसा : मालमत्ता तसेच सततच्या होणाऱ्या घरगुती वादातून भाची सूनेने सुपारी किलरच्या मदतीने आपल्याच दोन अविवाहित (सख्ख्या बहिणी) वृद्ध आत्यांचा कोयत्याने निर्घृण खून केला. ही खळबळजनक घटना बार्देश तालुक्यातील इग्रजवाडो मार्ना-शिवोली येथे उघडकीस आली. या दुहेरी हत्येचे कारस्थान रचल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली असून यात सुपारी किलरचा समावेश आहे.हा खूनाचा प्रकार १५ रोजी रात्री उशिरा ९.३० च्या सुमारास घडला. मार्ता लोबो (६४) व वीरा लोबो (६२) असे मयतांची नावे आहेत. तर रोविना लोबो (२९) व सुबहान राजाबली (२०, रा. आसगाव व मूळ : कर्नाटक) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांड प्रकरणात ज्युलिओ लोबो (रोविनाचा पती) हे तक्रारदार आहेत.पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, संशयित रोविना लोबो हिचे लग्न दहा वर्षांपूर्वी ज्युलिओ लोबो याच्यासोबत झाले होते. ते दोघेही मयत मार्ता व मयत वीरा यांच्यासोबत एकाच घरात राहत होते. यावेळी रोविना हिचे मार्ता व वीरा यांच्यासोबत नेहमीच खटके उडायचे. त्यामुळे रोविना हिने या दोघांचा काटा काढण्याचे ठरविले. त्याअनुषंगाने रोविना हिने सुपारी किलरचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यावेळी तिची भेट संशयित सुबान राजाबली (मजूर) याच्याशी झाली. त्यानंतर पैशांच्या आमिषाने राजाबली याने या दुहेरी खूनाचा भागीदार होण्यास तयारी दाखविली.यावेळी संशयितांनी पूर्वनियोजित या दोन बहिणींचा खून करण्याची तारीख व वेळ ठरविली. त्यानुसार रविवारी सायंकाळी या दोघांनी मिळून वरील बहिणींचा कोयत्याने तोंडावर व डोक्यावर सपासप वार करून निर्घृण खून केला. याप्रकरणी माहिती मिळताच हणजूण पोलिसांनी तपास चक्रे फिरवत शोध मोहिम राबविली व काही तासांभरातच संशयित रोविना व राजाबली यांना आसगाव येथून पकडले. त्यानंतर दोघांनी पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुरज गावस हे अधिक तपास करीत आहेत.रविवारी रात्री खून करण्याच्या इराद्याने रोविना हिने अगोदरच राजाबली याला घराच्या पाठिमागे नवीन बांधकाम सुरू असलेल्या एका खोलीत लपवून ठेवले होते. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास घराचे सर्व दिवे बंद करून झोपी जाण्याचे नाटक रचिले. त्यानंतर दिवे बंद झाल्याने खोलीतून मार्ता बाहेर आली असता रोविना हिने तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले व तिच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा केला. त्यानंतर तशाच पद्धतीने रोविना व राजाबली यांनी वीरा हिच्यावर प्रहार करून तिला देखील ठार मारले. दोघांवर रोविना हिने सर्वांत अगोदर हल्ला चढविला.
दुहेरी हत्याकांड! भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला दोन सख्ख्या बहिणींची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 16:45 IST
Double Murder : हणजूण पोलिसांकडून सुपारी किलरसोबत दोघा संशयितांना अटक
दुहेरी हत्याकांड! भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला दोन सख्ख्या बहिणींची हत्या
ठळक मुद्देया दुहेरी हत्येचे कारस्थान रचल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली असून यात सुपारी किलरचा समावेश आहे.