नागपुरात घरगुती वादात दुहेरी हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:16 PM2020-02-05T23:16:07+5:302020-02-05T23:24:13+5:30

सक्करदरा येथील दत्तात्रयनगरात घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नी व तिच्या मामाची हत्या केली. दोन दिवसांनंतर हे हत्याकांड उघडकीस आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Double murder in domestic dispute in Nagpur | नागपुरात घरगुती वादात दुहेरी हत्याकांड

नागपुरात घरगुती वादात दुहेरी हत्याकांड

googlenewsNext
ठळक मुद्देदत्तात्रयनगर येथील घटना : पत्नी व मामेसासऱ्याचा खूनआरोपी पतीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सक्करदरा येथील दत्तात्रयनगरात घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नी व तिच्या मामाची हत्या केली. दोन दिवसांनंतर हे हत्याकांड उघडकीस आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हत्येनंतर फरार पतीला पोलिसांनी चार तासातच अटक केली. मंजूषा जयंत नाटेकर (५५) आणि अशोक रामकृष्ण काटे (७५) अशी मृतांची नावे आहे. जयंत नाटेकर (६०) असे आरोपीचे नाव आहे.


नाटेकर दाम्पत्य दत्तात्रयनगरातील देशमुख अपार्टमेंटमध्ये राहत होते. अशोक वोल्टास कंपनीत वाहनचालक होते. त्यांनी व्हीआरएस घेतला होता. मंजूषा या गजानन हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा मुलगा सुजय चंद्रपुरात काम करतो. मंजूषाचे भाऊ संजय खणगणे आणि राजेश खणगणे जवाहरनगरात राहतात. अशोक काटे हे मंजूषाचे मामा होते. ते अविवाहित असल्याने त्यांची बहीण (मंजूषाची आई) सोबत राहत होते. दीड वर्षापूर्वी मंजूषाच्या आईचा मृत्यू झाला. तेव्हापासून अशोक काटे मंजूषाकडे राहायला आले. मंजूषाचे भाऊसुद्धा अधूनमधून येत जात होते. असे सांगितले जाते की, जयंत नाटेकर यांचा घरगुती कारणावरून पत्नी मंजूषासोबत वाद व्हायचा. सोमवारी सकाळी ११ वाजता त्याने पत्नी व तिच्या मामाशी वाद घातला. तो दोघांना मारहाण करू लागला. मामा अशोकने आरडाओरड करून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. अपार्टमेंटमधील लोक मंजूषाच्या फ्लॅटमध्ये आले. शेजाऱ्यांना पाहून जयंतला आणखी राग आला. त्याने शेजाऱ्यांना ‘हा माझ्या घरचा प्रश्न’ असल्याचे सांगत जायला सांगितले. त्याचे बोलणे ऐकून शेजारी परत गेले. शेजारी परत गेल्यानंतर जयंतने दोघांची हत्या केल्याचा संशय आहे. गळा आवळल्यानंतर त्याने चाकूने वार करून मंजूषा आणि तिच्या मामाचा जीव घेतला. दोघांची हत्या केल्यानंतर फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावून तो दुचाकीने निघून गेला. मंजूषा नियमित शाळेला जायच्या. त्या शाळेत न आल्याने मुख्याध्यापकांना संशय आला. त्यांनी मंजूषाशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने भाऊ राजेश खणगणे यांच्याशी संपर्क साधला. राजेशनेसुद्धा मंजूषाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचाही संपर्क न झाल्याने ते फ्लॅटवर पोहोचले. त्यांच्याजवळ फ्लॅटची डुप्लीकेट चावी होती. दरवाजा उघडताच दुर्गंध पसरला.
राजेशला हॉलमध्ये मामा आणि बेडरूममध्ये बहिणीचे मृतदेह आढळून आले. त्यांनी पोलिसांना सूचना दिली. घटनेची माहिती होताच पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अपर पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, उपायुक्त चिन्मय पंडित घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह मेडिकलला रवाना करीत जयंतचा शोध सुरू केला. चार तासांच्या आत तो पोलिसांच्या हाती लागला. मंजूषाने आपल्याला मारहाण केल्यामुळे आपण दोघांची हत्या केली असे त्याचे म्हणणे आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

धोका ओळखू शकले नाहीत शेजारी
जर शेजाऱ्यांनी सतर्कता दाखवली असती तर या घटनेची वेळीच माहिती मिळाली असती. मिळालेल्या माहितीनुसार जयंतने हल्ला केला तेव्हा मंजूषा वाचवण्यासाठी आरडाओरड करीत होती. परंतु जयंतने आधीच फटकारल्यामुळे शेजाऱ्यांनी पुन्हा जाणे योग्य समजले नाही. त्याचप्रमाणे शेजाऱ्यांनी जयंतला फ्लॅटला कुलूप लावून जातानाही पाहिले. त्यानंतरही पत्नी आणि तिचा मामा कुठे आहे, हा विचार त्यांच्या मनात आला नाही. जयंत गेल्यावर शेजारी निश्चिंत झाले. दोन दिवस मृतदेह फ्लॅटमध्ये पडून होते. परंतु कुणालाही दुर्गंधी आली नाही.

मंजूषा करायची मारहाण
आरोपी जयंतच्या म्हणण्यानुसार तो गेल्या १० वर्षांपासून बेरोजगार आहे. मंजूषाच्या पगारातूनच घर चालत होते. मंजूषा त्याच्याशी योग्य व्यवहार करीत नव्हती. मंजूषाने अनेकदा त्याला थापड मारली. त्यामुळे त्याला अपमान झाल्यासारखे वाटायचे. घटनेच्या दिवशीही त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे दुखावल्याने त्याने खून केला. मंजूषाच्या कुटुंबीयांनी मात्र जयंतचे म्हणणे नाकारले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, क्षुल्लक कारणांवरून वाद होत होते. यापूर्वी जयंतने कधीच मारहाण केली नव्हती. शेजाऱ्यांचेही तेच म्हणणे आहे.

 

Web Title: Double murder in domestic dispute in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.