दोस्त दोस्त ना रहा..! भांडणातून घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:23 IST2025-07-17T06:22:52+5:302025-07-17T06:23:00+5:30
- सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : दिवसरात्र सोबत राहणाऱ्या मित्राने जुन्या भांडणाच्या रागातून नशेच्या आहारी गेलेल्या मित्राला संपविल्याची ...

दोस्त दोस्त ना रहा..! भांडणातून घेतला जीव
- सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : दिवसरात्र सोबत राहणाऱ्या मित्राने जुन्या भांडणाच्या रागातून नशेच्या आहारी गेलेल्या मित्राला संपविल्याची घटना ३ जुलैला उल्हासनगरच्या प्रेमनगर टेकडी परिसरात घडली. हिल लाइन पोलिसांनी आरोपीला काही तासांत अटक केली.
उल्हासनगर कॅम्प नं. ५ येथील अनिल रामचंदानी कांबळे हा प्रेमनगर टेकडी परिसरात राहत होता. तो नशेच्या आहारी गेल्याने, २० वर्षांपासून त्याची पत्नी मुलासह अंबरनाथमध्ये राहते; तर अनिल आई लक्ष्मीसोबत आनंदपुरी दरबार परिसरात राहतो. त्याच परिसरात राहणारा शकील खलील शेख हा त्याचा मित्र होता. दोघेही एकत्र काम करून, रात्री दारूपार्टी करायचे. अशाच एका पार्टीत दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. या रागातून शकील याने अनिलचा खून केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप व तपास अधिकारी सिद्धेश्वर कैलासे यांनी दिली.
प्रेमनगरटेकडी येथे राहणारी बहीण सुरेखा काळपुंड हिच्याकडे ३ जुलैला सकाळी ११ वाजता अनिल गेला होता. तेथून तो कामावर जातो म्हणून निघाला. रात्री ८ वाजता सुरेखाकडे आई आली आणि अनिल घरी न आल्याने चिंता व्यक्त केली.
रात्री १०:३० वाजता काही पोलिस घरी आले व त्यांनी एक फोटो दाखवीत ‘हा अनिल आहे का?’ अशी विचारणा केली. तेव्हा सर्वजण काळजीत पडले. काहीतरी वाईट घटना घडली असावी, अशी शंका अनिलच्या नातेवाईकांना आली. याच परिसरातील एका खोलीत अनिल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
खून करून पळाला...
अनिलची बहीण सुरेखाने शकीलच्या पत्नीकडे विचारणा केल्यावर, शकील घाबरून घरातून पळून गेल्याचे तिने सांगितले. शकीलने अनिलला लाकडी दांड्याने मारल्याचे उघड झाले. सुरेखाच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला. शकील व अनिल सोबत राहून मिळेल ते काम करीत होते. मात्र जुन्या भांडणातून मित्राने मित्राचा खून केल्याची माहिती तपास अधिकारी सिद्धेश्वर कैलासे यांनी दिली.