सासू-जवायाचा वाद विकोपाला...जावयाने सासुला विहिरित ढकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 19:30 IST2022-02-08T19:29:42+5:302022-02-08T19:30:44+5:30
Dispute between mother-in-law and son-in-law : या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून, आरोपी फरार असल्याची माहिती आहे.

सासू-जवायाचा वाद विकोपाला...जावयाने सासुला विहिरित ढकलले
वाडेगाव : येथील पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या ढोरे यांच्या शेतात रखावलीकरिता वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील ६० वर्षीय मजूर सासूला जावयाने मारहाण करून विहिरीत ढकलल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून, आरोपी फरार असल्याची माहिती आहे.
बाळापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव येथील शेतकरी ढोरे यांच्या शेतात जावई विलास मारोती इंगळे व सासू चंद्रकला बळीराम डाखोरे यांचे वाद झाले. यामध्ये जावयाने सासूला मारहाण केली. या वादाचे पर्यवसान होऊन जावयाने सासूला ६० फूट खोल विहिरीत फेकल्याची घटना घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. घटनेबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी बाळापूर पोलीस स्टेशन ठाणेदार घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृत महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेतील आरोपी विलास मारोती इंगळे (३५) पळून गेल्याची माहिती आहे. पुढील तपास वाडेगाव पोलीस करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
चिमुकल्याने पळ काढला म्हणून जीव वाचला
हा प्रकार पाहताच आरोपीचा दोन-तीन वर्षांचा मुलगा ‘बाबा मारू नका, मारू नका’ म्हणत तिथून पळून गेला. त्यामुळे त्याचा जीव वाचला असल्याचे चिमुकल्याने सांगितले.
फोटो