वडिलांच्या अफेअरमुळे दिशाची आत्महत्या; सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये पोलिसांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:26 IST2025-03-29T15:25:45+5:302025-03-29T15:26:17+5:30
ती ज्या प्रोजेक्टवर काम करत होती त्यापैकी दोन प्रोजेक्ट रखडले होते. त्यामुळे ती अस्वस्थ होती, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

वडिलांच्या अफेअरमुळे दिशाची आत्महत्या; सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये पोलिसांचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दिशा सालियनच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट उघड झाला आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांचे प्रेम प्रकरण आणि त्यांनी केलेली आर्थिक फसवणूक यामुळे तिने आत्महत्या केल्याचा दावा क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
प्रोजेक्टमधील अपयश, मित्रांसोबत झालेले गैरसमज तसेच दिशाने कष्टाने कमावलेल्या पैशांचा वडिलांनी गैरवापर करून ठाणे येथील त्यांच्या मसाल्यांच्या उत्पादन युनिटमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर खर्च केला. त्यांचे तिच्याशी प्रेमसंबंध होते, असा दावा क्लोजर रिपोर्टमध्ये आहे. दिशा कॉर्नरस्टोन कंपनीत सेलिब्रेटी मॅनेजर म्हणून काम करत होती. ती ज्या प्रोजेक्टवर काम करत होती त्यापैकी दोन प्रोजेक्ट रखडले होते. त्यामुळे ते अस्वस्थ होती, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू
दिशाच्या सर्व मैत्रिणी आणि तिचा प्रियकर रॉय याने पोलिसांना जबाब सांगितले की, तिने त्यांना तिच्या वडिलांच्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितले होते. तिने कष्टाने कमावलेले पैसे दुसऱ्या महिलेवर कसे खर्च केले त्याबाबतही तिने तिच्या खास मित्रांना व रॉयला सांगितले होते, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. आधीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद केले होते की, त्याच्यावर कोणताही प्रकारच्या हल्ल्याचे पुरावे नाहीत. दिशाचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने झाला, असे अहवालात नमूद केले आहे.
आरोपात तथ्य नाही. २०२१ मध्ये हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. २०२३ मध्ये ही फाइल पुन्हा उघडण्यात आली. सतीश सालियान यांचा नव्याने जबाब नोंदविण्यात आला. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन झाली. याचाच अर्थ मालवणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट अर्थहीन ठरतो. पोलिसांनी आत्महत्येचा आभास निर्माण करण्यासाठी खोट्या, दिशाभूल करणाऱ्या नोंदी घेतल्या, हे सतीश यांनी आधीच तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे मालवणी पोलिसांच्या या क्लोजर रिपोर्टमुळे आरोपींना कोणताही फायदा मिळणार नाही. आरोपींकडून दिशाभूल करण्यासाठी ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याबाबतही आम्ही नोटीस बजावत तक्रार करणार आहोत.
-ॲड. नीलेश ओझा, सतीश सालियान यांचे वकील