Delhi Crime news: देशाची राजधानी दिल्लीत एक भयंकर घटना घडली. एकाच घरात चार व्यक्तीचे मृतदेह आढळून आले. हे चौघेही मॅकेनिकल इंजिनिअर होते. जे चार जण मृतावस्थेत आढळून आले, त्यांचा मृत्यू एसी गॅसमुळे झाला असावा, असे पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले. चौघांचीही ओळख पटली असून, ते मूळचे उत्तर प्रदेशातील बरेलीचे आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इमरान उर्फ सलमान (वय ३०), मोहसिन (वय २०), हसीब आणि कपिल उर्फ अंकित रस्तोगी (वय १८) अशी मृतांची नावे असून, मृतांमध्ये दोन भावांचाही समावेश आहे. चौघेही उत्तर प्रदेशातील असून, दिल्लीत राहत होते. ते एसी दुरुस्तीचे काम करायचे.
चौघांबद्दल पोलिसांना कसं कळालं?
ही घटना दक्षिण दिल्लीतील दक्षिणपुरी भागात घडली. शुक्रवारी सकाळी पोलीस नियंत्रण कक्षात एक कॉल आला. भलसवा डेअरी येथील रहिवाशी झिशान याने हा कॉल केला होता. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याचा भाऊ कॉल उचलत नाहीये.
माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्याच्या घरी पोहोचले. त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडला आणि आत गेले, त्यावेळी तीन जणांचे मृतदेह पडलेले होते, तर एक जण बेशुद्धावस्थेत आढळून आला. पोलिसांनी तातडीने त्याला आंबेडकर रुग्णालयात नेले. नंतर त्याला सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर एम्स ट्रॉमा सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकती गंभीर आहे.
तिघांचा मृत्यू एसी गॅसमुळे झाला?
पोलिसांनी प्राथमित तपासाअंती तिघांचा मृत्यू एसीतील गॅसमुळे झाला असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एसी गॅस लिक झाला आणि त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत्यूचे कारण पोस्टमार्टेम रिपोर्टमधूनच कळेल, असेही पोलिसांनी सांगितले.
एसीमध्ये कोणता गॅस असतो?
या घटनेमुळे एसीमध्ये असणाऱ्या गॅसचा मुद्दा चर्चेत आला आहे. एसीमध्ये साधारणपणे HFC (हायड्रोफ्लोरोकार्बन) गॅससारखा गॅस असतो. R-32, R-410A किंवा R-22 या श्रेणीतील गॅस भरला जातो. हा गॅस घर थंड ठेवतो.
हा गॅस इतका विषारी नसतो की, मृत्यू होईल. पण, बंद खोलीत जास्त प्रमाणात हा गॅस लिक झाला तर त्यामुळे माणसाचा गुदमरून मृत्यू होऊ शकतो.