दिल्लीपोलिसांनी अशा एका चोराला अटक केली आहे जो सुशिक्षित आहे. बी.टेकची डिग्री घेतलेला हा चोर देशातील मोठ्या रुग्णालयांमध्ये चोरी करायचा. मात्र चोरीचं कारण ऐकून तुम्हालाही थोडा धक्का बसेल. दिल्लीपोलिसांच्या दक्षिण-पूर्व जिल्हा पथकाने त्याला अटक केली आहे. या चोराने दिल्ली-एनसीआर, जयपूर, मुंबई आणि पुण्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये चोरी केली आहे. टेक्नॉलॉजी वापरून तो चोऱ्या करायचा.
विकास नावाच्या या हाय-टेक चोराने पुण्यातील एमआयटीमधून बी.टेक केलं होतं. तो चोर कसा बनला याचे कारण आश्चर्यकारक आहे. विकासने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये कोरोना साथीच्या काळात रुग्णालयाने त्याला उपचार बिलात सवलत दिली नाही, ज्यामुळे तो कर्जबाजारी झाला. या कारणास्तव, त्याने डॉक्टर आणि रुग्णालयांचा बदला घेण्याच्या उद्देशाने चोरी करण्यास सुरुवात केली.
रुग्णालयांमधून चोरायचा 'या' महागड्या वस्तू
विकास देशातील मोठ्या रुग्णालयांमधून लॅपटॉप, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू चोरायचा. पोलिसांनी आरोपींकडून चार लॅपटॉप, एक मोबाईल, एक एपल एअरपॉड्स, महागडे गॉगल आणि ६,१०० रुपये रोख जप्त केले आहेत.
कसा पकडला गेला?
१० एप्रिल रोजी सरिता विहार येथील अपोलो हॉस्पिटलमधून एक लॅपटॉप आणि मोबाईल चोरीला गेला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्यात आली. आरोपी दिल्लीतील पहाडगंज येथील एका हॉटेलमध्ये राहत असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी तिथे सापळा रचला आणि त्याला अटक केली.
एमआयटी पुणे येथून केलं बीटेक
पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने आतापर्यंत जयपूर, दिल्ली, मुंबई आणि पुण्यातील अनेक रुग्णालयांमध्ये चोरी केली आहे. त्याच्याविरुद्ध दिल्ली आणि नोएडाच्या पोलीस ठाण्यात अनेक एफआयआर दाखल आहेत. तसेच पुणे आणि मुंबईमध्येही त्याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत.