एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ; हत्या की आत्महत्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 12:57 IST2021-11-30T12:56:17+5:302021-11-30T12:57:48+5:30
पती, पत्नीसह दोन मुलांचे मृतदेह आढळले; फॉरेन्सिक टीम घटनास्थळी

एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ; हत्या की आत्महत्या?
दिल्ली: दिल्लीतील एका घरात चार जणांचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ माजली आहे. आऊटर नॉर्थ जिल्ह्यातील सिरसपूर गावात एका घरात पती, पत्नी आणि २ मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. पोलिसांनी प्राथमिक चौकशीतून आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे. चारही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
मंगळवारी सकाळी एका घरात चौघांचे मृतदेह सापडले. याची माहिती शेजारच्या व्यक्तींनी पोलिसांना दिली. पोलिसांना घटनास्थळी एक मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत सापडला. मृत व्यक्तीचं नाव अमित असून त्याचं वय ३५ वर्षे होतं. त्याची पत्नी निती (वय २७ वर्षे), मुलगी वंशिका (वय ६ वर्षे) आणि मुलगा कार्तिक (वय २ वर्षे) यांचे मृतदेह बेडवर आढळून आले. चारही जणांच्या मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत.
पोलीस घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचं काम करत आहेत. फॉरेन्सिक टीमदेखील घटनास्थळीदेखील दाखल झाले आहेत. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब बऱ्याच कालावधीपासून सिरसपूर गावात वास्तव्यास होतं. अमित लहानमोठी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये बरेच वाद सुरू होते.