आणखी एक श्रद्धा! लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 19:49 IST2023-02-14T19:49:30+5:302023-02-14T19:49:40+5:30
निक्की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र तिचा प्रियकर दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याच्या तयारीत होता.

आणखी एक श्रद्धा! लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला, मग...
नवी दिल्ली - अलीकडेच श्रद्धा वालकर हत्याकांड देशभरात गाजले. त्यानंतर दिल्लीत आणखी एका श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती घडली आहे. एका ढाब्याच्या फ्रिजमध्ये पोलिसांना युवतीचा मृतदेह सापडला. या प्रकरणातील आरोपीला अटक करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. दिल्लीच्या बाबा हरिदास नगर परिसरातील ही घटना आहे.
निक्की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र तिचा प्रियकर दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याच्या तयारीत होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निक्कीनं तिच्या बॉयफ्रेंडला वॉर्निंग दिली होती. जर त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केले तर ती त्याला अडकवेल. त्या दबावानंतरच आरोपीने निक्कीच्या हत्येचा कट रचला त्यानंतर हा गुन्हा केल्याचे समजते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून कुठलीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला.
आरोपीने स्वत: गुन्हा केला कबुल
विशेष म्हणजे आरोपीने सकाळी त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केली त्यानंतर त्याच संध्याकाळी घरच्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलीशी लग्न केले. चौकशीदरम्यान, आरोपी साहिलने स्वतः सांगितले की, त्याने १० फेब्रुवारी रोजी ISBT, दिल्लीजवळ एका कारमध्ये निक्कीचा गळा दाबून खून केला होता, खून केल्यानंतर तो मृतदेहासोबत कारमध्ये फिरत राहिला, त्यानंतर त्याने ढाब्याच्या फ्रीजमध्ये मृतदेह लपविला.
या संपूर्ण प्रकरणावर एडीसी विक्रम सिंह यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह ढाब्यात लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तपासानंतर आरोपी साहिल गेहलोत याला अटक करण्यात आली आहे. आता पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती
यापूर्वी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. श्रद्धाचा प्रियकर आफताब याने तिची दिल्लीतील मेहरौली येथे हत्या केल्याचा आरोप आहे. आफताबने गेल्या वर्षी १८ मे रोजी श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. यानंतर मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले. मृतदेह ठेवण्यासाठी आफताबने फ्रीज विकत घेतला होता. यामध्ये त्याने मृतदेहाचे तुकडे ठेवले. तो रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचा तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे. इतकंच नाही तर श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता, एवढेच नाही तर त्याच्या इतर मैत्रिणीही त्याला भेटायला या फ्लॅटमध्ये येत होत्या.